
धारावीचा पुनर्विकास करताना धारावीतच घर मिळाले पाहिजे असा जोरदार आग्रह धारावीकरांनी धरला आहे. त्याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न करूनही भेट झालेली नाही. त्यामुळे उद्या सकाळी कुर्ला मदर डेअरीपासून धारावीकर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत निवेदन मार्च काढणार आहेत.
लोकचळवळच्या माध्यमातून सर्वपक्षीय कार्यकर्ते धारावीसाठी एकवटले आहेत. आज त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्याच्या निवेदन मार्चची घोषणा केली. सात रेल्वे स्थानकांशी कनेक्ट असलेला धारावीचा सुखसोयी असलेला परिसर विकासाच्या नावाखाली उद्योगपती अदानींच्या घशात घातला जात आहे. एक लाख लोकांना 500 चौरस फुटाचे घर दिले तरी धारावीतील जागा कमी पडणार नाही. असे असतानाही सुमारे 80 हजार धारावीकरांना अपात्र ठरवून बेदखल करण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे. त्याविरोधात सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिले असून त्यातही फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप यावेळी शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी केला. याप्रसंगी धारावी बचाव आंदोलनासह शेतकरी कामगार पक्ष, मनसे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्या वर्षा निवासस्थानी जाऊन हजारो धारावीकर मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी धारावी बचाव आंदोलनाचे राजू कोरडे, मनसेचे वाघमारे, काँग्रेसचे जाफरभाई उपस्थित राहणार आहे.