धारावीतील झोपडपट्टीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्राधिकरणाने (डीआरपी) म्हाडाचे तब्बल साडेपंचवीस कोटी रुपये भाडे थकवले आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचे थकीत भाडे लवकरात लवकर भरावे यासाठी म्हाडाने डीआरपीला गुरुवारी नोटीस धाडली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे कार्यालय म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या पाचव्या मजल्यावर आहे. कक्ष क्र. 619 मध्ये असलेल्या सुमारे सात हजार चौरस फुटांच्या या प्रशस्त कार्यालयासाठी म्हाडा दरमहा 265 रुपये प्रति चौरस फूट दराने भाडे आकारते. डीआरपी कार्यालयाने वर्षानुवर्षे हे भाडे भरलेले नसल्यामुळे थकीत भाडे आणि त्यावरील व्याजाच्या रकमेत सातत्याने वाढ होत आहे. सप्टेंबरपर्यंत थकीत भाडे आणि व्याजाची रक्कम मिळून डीआरपीने साडेपंचवीस कोटी रुपये भाडे थकवल्याचे समोर आले आहे. थकीत भाडे वसूल करण्यासाठी म्हाडा आता अॅक्शन मोडवर आली असून डीआरपीला नोटीस धाडली आहे.
पंधरा दिवसांत भाडे भरा अन्यथा…
डीआरपी कार्यालयातील स्वच्छतागृह, विद्युत पुरवठा, इमारत आणि कार्यालयाची देखभाल, साफसफाई, पाणीपुरवठा, सुरक्षा रक्षक अशा सोयीसुविधा म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे पुरवल्या जातात. या सोयीसुविधांसाठी म्हाडाकडून संबंधित प्राधिकरणाला रक्कम अदा करण्यात येते. असे असतानाही वारंवार म्हाडाने नोटीस बजावूनदेखील डीआरपीने भाडे भरलेले नाही. नोटीस मिळताच पंधरा दिवसांत थकबाकी भरा, अन्यथा निष्कासनाची कारवाई करण्यात येईल तसेच थकीत भाडे वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी नोटीस म्हाडाने डीआरपीला धाडली आहे.
नव्या जागेत कार्यालय स्थलांतराच्या हालचाली
डीआरपी कार्यालय लवकरच किंग्ज सर्कल येथील एका तीन मजली भव्य इमारतीत स्थलांतर होणार असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून सध्याच्या कार्यालयातील फायलींची आवराआवर सुरू आहे. सध्या धारावीत नंबरिंग आणि डोअर टू डोअर सर्वेक्षण अशी कामे सुरू झाली आहेत. येत्या काळात आणखी काही कर्मचारी-अधिकारी कंपनीत रुजू होणार आहेत. सध्या असलेली जागा अपुरी पडत असल्यामुळे किंग्ज सर्कल येथील एका तीन मजली भव्य इमारतीत कार्यालय हलविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, नव्या जागेत स्थलांतर करण्यापूर्वी तरी डीआरपी कार्यालय थकीत भाडे भरणार का, याकडे लक्ष लागले आहे.