धारावीत दिवसभरात एकही रुग्ण नाही, झिरो पॉझिटिव्ह असल्याची दुसरी वेळ

एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोना आता उतरणीला लागला असून आज दिवसभरात एकही नवीन रुग्ण सापडला नाही. धारावी झिरो पॉझिटिव्ह होण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधी 25 डिसेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा धारावीत एकही रुग्ण सापडला नव्हता. सध्या धारावीत 10 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे आता धारावीची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत 1 एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. कोरोनाने शिरकाव केल्यानंतर 8 लाखांच्या दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट’ बनली होती.

मात्र, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ राबवण्यात आला. याला चांगलेच यश आले. पालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळेच जुलै महिन्यापासून धारावीत रुग्णसंख्या खर्‍या अर्थाने नियंत्रणात आली. जुलै महिन्यात धारावीत कोरोनाचे दोन नवे रुग्ण होते तर 519 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होते.

दादर, माहीममध्येही कोरोना आटोक्यात

जी-उत्तर विभागात धारावीसह येणाऱ्या दादर, माहीम परिसरातही रुग्णांची संख्याही आता कमी झाली आहे. गुरुवारी दादरमध्येही दुसऱ्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. आज दादरमध्ये 2 तर माहीममध्ये 3 रुग्ण सापडले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या