
स्वार्थाचा त्याग करून लोकं एकत्र राहू लागतील आणि चांगल्या मूल्यांचे पालन करतील, तेव्हाच जगात शांतता येईल. हिंदुस्थानमध्ये सर्वांना एकत्र करण्याची शक्ती आहे. त्यामुळे जगात सुरू असलेले युद्ध केवळ हिंदुस्थानच थांबवू शकतो, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयाची पायाभरणी केल्यानंतर ते एका सभेला संबोधित करत होते.
भागवत म्हणाले की, जागतिक संघर्षांचे खरे कारण स्वार्थ आणि वर्चस्वाची लालसा आहे. हीच गोष्ट जगभरातील संघर्षांना चालना देत आहे. चिरस्थायी शांतता केवळ एकता, शिस्त आणि धर्माच्या पालनातूनच शक्य आहे. ते म्हणाले की, हिंदुस्थानची ‘सर्व एक आहेत’ ही प्राचीन परंपरा जगाला सलोख्याचा मार्ग दाखवू शकते.
जगात चिरस्थायी शांतता केवळ स्वार्थाचा त्याग, एकता आणि चांगल्या मूल्यांचे पालन केल्यानेच येईल. त्यांनी स्वार्थ आणि वर्चस्वाची इच्छा ही जागतिक संघर्षांचे मूळ असल्याचे वर्णन केले. जग गेल्या २,००० वर्षांपासून संघर्ष सोडवण्यासाठी विविध प्रयोग करत आहे, परंतु त्यात फारसे यश आलेले नाही. धार्मिक असहिष्णुता, सक्तीचे धर्मांतर आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या कल्पना अजूनही टिकून आहेत. त्यामुळे संघर्ष वाढत आहेत, असेही ते म्हणाले.
आज जग विनाशाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. जगात सुरू असलेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर, हिंदुस्थानच ही युद्धे थांबवू शकतो. या संघर्षाला काही अर्थ नाही; खरा अर्थ समन्वयात आहे. हिंदुस्थानमध्ये सर्वांना एकत्र आणण्याची शक्ती आहे, पण त्यासाठी देशात धर्माचे पालन करणे आवश्यक आहे.



























































