विशेष – बांगलादेशातील अराजकास जबाबदार कोण?

>> डॉ. वि. . धारुरकर

बांगलादेशातील षड्यंत्रामागे परकीय हात कार्यरत असल्याचे उघड होत आहे. शेख हसीना यांनी थेट अमेरिकेवर आरोप केला असला तरी बांगलादेशातील हिंसाचाराचा आगडोंब उसळण्यात आणि पसरण्यामध्ये चीन व पाकिस्तानचा हात उघड होत आहे. चीनच्या या छुप्या कारवायांपासून आशियातील सर्व देशांनी सावध राहिले पाहिजे. विशेषत भारताला सर्व शेजारी राष्ट्रांमध्ये होत असलेला  चीनचा चंचूप्रवेश रोखण्याची आवश्यकता आहे

गेल्या 15 दिवसांपासून बांगलादेश धुमसत होता आणि अखेर बांगलादेशच्या निवडून आलेल्या लोकनियुक्त पंतप्रधानाला देश सोडून जाण्याची पाळी आली. हा एवढा दुर्धर प्रसंग का ओढवला? बांगलादेशात हे सर्व महाभारत कसे घडले? या प्रश्नांची उत्तरे खणून काढली असता शेवटी ते प्रकरण अमेरिका, चीन आणि पाकिस्तानने कसे वाढविले याचा शोध घेतला पाहिजे.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्या वतव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. बांगलादेशातील अराजकतेला अमेरिकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  शेख हसीना यांनी अमेरिकेला सेंट मार्टिन बेट न दिल्यामुळे अमेरिकेने त्यांना सत्तेवरून हटवण्याची योजना आखली होती, असे हसीना यांनी म्हटले आहे. बांगलादेशकडून सेंट मार्टिन बेट घेऊन तिथे नौदलाचे व लष्करी तळ उभारण्याची अमेरिकेची योजना होती. ज्याद्वारे अमेरिकेला बंगालच्या उपसागरावर स्वतचा प्रभाव निर्माण करता आला असता. याला विरोध केल्याने अमेरिकेने त्यांना सत्तेवरून हटवण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय चाली खेळल्या आणि त्यात ते यशस्वी झाले, असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेची बांगला देशासंदर्भातील भूमिका आणि या संघर्षानंतरची त्यांची वक्तव्ये हसीना यांच्या कथनात तथ्य असल्याचे दर्शवणारी आहेत; पण बांगलादेशातील अराजकामध्ये एकट्या अमेरिकेची भूमिका होती असे मानता येणार नाही. यामध्ये चीनचा हातही महत्त्वाचा आहे. चिनी ड्रगनच्या कृपेने मागील काळात अशाच पद्धतीच्या घटना नेपाळमध्ये झाल्या, श्रीलंकेत झाल्या. तशीच घटना बांगलादेशात करून तेथील राजकारण आपल्या हातात घ्यावयाचे आणि आपले डमी सरकार तेथे आणावयाचे असा चीन आणि पाकिस्तानचा डाव असून त्यामध्ये ते अंशत यशस्वी झाले आहेत.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जाण्यास का व कसे भाग पाडण्यात आले? त्यामागे चीन आणि पाकिस्तानने काय काय करामती केल्या? कोणकोणती खलबते केली? हे समजून घेतले पाहिजे. विशेषत कोटा प्रश्नावरून हसीनांची बदनामी, मालमत्तेचा विध्वंस आणि देशभर आाढस्ताळेपणा करण्यात पाकिस्तानी बाह्य गुप्तचर यंत्रणा आयएसआयने अनेक उपद्व्याप केले आहेत. आयएसआय आणि एमएसएस म्हणजे चिनी सुरक्षा मंत्रालय यांचा हात असल्याचे आता गुप्तचर यंत्रणा सिद्ध करीत आहेत. इंटेल या गुप्तचर यंत्रणेने अनेक धागेदोरे शोधून काढले आहेत आणि त्यावर नवा प्रकाश टाकला आहे. चीन आणि पाकिस्तानचे हे सर्व उपद्व्याप पाहता भविष्यकाळात भारताला अधिक सतर्क राहून आपल्या शत्रूंच्या हालचालींची अधिक माहिती संकलित करण्याची गरज निर्माण झाली आहे. चीन आणि आयएसआय यांनी बांगलादेशातील प्रस्थापित सरकार बाजूला हटवून तेथे आपल्याला पाहिजे असलेले बाहुले सरकार स्थापन करण्याचा कसा प्रयत्न केला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

बांगलादेशातील विद्यार्थ्यांची आंदोलने वाढविण्याचा कसा प्रयत्न करण्यात आला? तडजोडीला ते का तयार झाले नाहीत? कोणत्या कारणामुळे ही चळवळ सतत तापवत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला? या प्रश्नांची उत्तरे शोधली असता असे लक्षात येते की, इस्लामी छात्र शिबीर आयसीएस या संघटनेला पेटविण्याचे कार्य आयएसआय आणि चीनने केले. जमात-ए-इस्लामी या पक्षाची ही विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेला हाताशी धरून बांगलादेशला भारतविरोधी दहशतवादी चळवळीचे केंद्र बनविण्याचा खटाटोप ते करीत आहेत. तसेच ही संघटना अर्कत उल जिहाद अल इस्लामी या पाकमधील संघटनेशी संपर्क ठेवून आहे. तसेच बांगलादेशची होत असलेली प्रगती त्याचा वाढत असलेला जीडीपी दर आणि भारत-बांगलादेश यांच्यात अलीकडे झालेले महत्त्वपूर्ण 15 करार या सर्व गोष्टीही चीनच्या डोळ्यात सलत होत्या. तेथे आपल्याला हवे असलेले सरकार निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न होता. चीनबरोबर काही करार करण्यात शेख हसीना यांनी नकार दिल्यामुळे चीन त्यांच्यावर नाराज होता.

मागील 15 दिवसांपासून बांगलादेश धुमसतो आहे, खदखदतो आहे. त्यामागे विध्वंसक विदेशी हात काम करीत होते, ही गोष्ट कळल्यानंतर धक्का बसल्याशिवाय राहत नाही. गेल्या महिन्यात सरकारी नोकऱ्यांतील 30 टक्के कोटा राखीव करण्याच्या विरोधामध्ये जे तीव्र आंदोलन झाले ते खरेतर एक नाटक होते काय? आणि हे नाटक चीन आणि पाकिस्तानच्या आशीर्वादाने चालले होते काय? विविध विद्यार्थी गटांनी केलेल्या हिंसाचारात 300हून अधिक लोक कामी आले. त्या निष्पाप लोकांचे प्राण कोणी घेतले? या आंदोलनात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली. हजारो लोकांना जखमी करण्यात आले. ते बिचारे आज हे सारे दुःख सहन करीत आहेत.

पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार होण्याचे आवाहन ही मंडळी का करीत होती? त्यामागे त्यांचे स्वार्थी राजकारण होते. पण जातीभेदाविरुद्ध लोकशाहीसाठी लढत आहोत, असे बॅनर घेऊन गेल्या महिन्यामध्ये विविध संघटनांनाही एकत्र करण्यात आले व तापलेल्या तव्यावर हसीनाविरोधी राजकारणाची पोळी भाजण्यात आली.

बांगलादेशातील विरोधी पक्षाने एकत्र येऊन, माध्यमांचा उपयोग करून आणि समाजातील विविध वर्गांना सरकारविरोधामध्ये खतपाणी घालून आंदोलन उभे करण्यात ते काही काळ यशस्वी झाले आणि पुढे दीर्घकाळात अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली की हसीना यांना पळ काढावा लागला. आयएसआय आणि चीन यांनी विद्यार्थी संघटनांना भडकवल्यामुळे विद्यार्थीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते व त्यांचे आंदोलन चालू राहिले. त्यातून हे सारे भयानक प्रकार घडले. 93 टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे नोकऱ्या दिल्या जातील. फक्त 5 टक्के विद्यार्थ्यांना कोटा पद्धतीचा उपयोग करता येईल, असे न्यायालयाने सांगितले होते. न्यायालयाचा हा निर्णय चुकीचा नव्हता. तोडगा योग्य होता. परंतु हा तोडगा विद्यार्थ्यांना पटविण्यात सरकारला अपयश आले ही गोष्ट खरी आहे. जमात-ए- इस्लामच्या इस्लामिक छात्र शिबीर या युवक आघाडीने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले आहे. त्यांचे ध्येय बांगलादेशात तालिबानसारखे सरकार स्थापन करण्याचे आहे.

लाल चीनचे आर्थिक बळ 

अंतरिम सरकारचे मुख्य होणारे महंमद युनूस यांना आता प्रादेशिक गटामध्ये समन्वय साधून शांतता प्रस्थापित करण्याचे अवघड काम करावयाचे आहे. अवामी लीग सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे चीन व आय.एस.आय. यांनी ठरविले व त्याप्रमाणे कारवाया केल्या. जमात-ए-इस्लाम या संघटनेला चीनकडून भरीव आर्थिक पाठबळ मिळाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा सर्व व्यवहार पाकिस्तानमध्ये घडला. थोडक्यात, या आंदोलनासाठी लागणारा पैसा हा चिनी संस्थांकडून आला असल्याचे सांगितले जाते. एका गुप्तचर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार छात्र शिबिराला मोठ्या प्रमाणात निधी चीनकडून प्राप्त झाला व या पैशाचाच उपयोग त्यांनी शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलने करण्यासाठी केला. नाहीतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलने इतक्या तयारीनिशी परकीय पैशाचा हात असल्याशिवाय कशी होतील?

सरकारविरोधी ठाम भूमिका आणि जिहादी प्रवृत्तीची कट्टर आंदोलने करण्याचे प्रशिक्षण त्यांना आधीच प्राप्त झाले होते. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण देण्यात या सर्व गटांचा समावेश होता. तसेच आयएसआय समर्थित हरकत उल जिहाद अल् इस्लाम या संघटनेशी अनेक विद्यार्थी संघटनांच्या संलग्नतेमुळे हे आंदोलन तीव्र बनले ही गोष्ट लक्षात घेतले पाहिजे. चिनी संघटनांकडून आर्थिक समर्थनाचे आश्वासन मिळाल्यानंतरच विद्यार्थी संघटना अधिक साक्रिय झाल्या असेसुद्धा मत गुप्तचर यंत्रणांनी प्रामुख्याने नोंदविलेले आहे. अशा प्रकारे विविध दहशतवादी गट हे पाकिस्तान व चीनकडून पैसा मिळवीत होते. तसेच शस्त्रे, साधनसामुग्री यांचा उपयोग करण्याचे प्रशिक्षण घेऊन आलेले होते. त्यामुळे ते हिंसा पसरविण्यात आणि आंदोलने तीव्र करण्यात यशस्वी ठरले. खोट्या प्रचारामध्ये चिनी गुप्तचर यंत्रणा आघाडीवर होती.

समारोप 

शेख हसीना यांना हे वेळीच लक्षात आले असते व त्यांनी थोडी सावधगिरी बाळगली असती तर या विद्यार्थ्यांना शांत करण्यात  त्यांना यश आले असते. पण विद्यार्थ्यांना ही शांतता नकोच होती. त्यांना चीन व पाकिस्तानकडून सतत हा विषय तापत ठेवण्याची व सरकारला राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यासाठी वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामध्ये ते यशस्वी ठरले आणि शेख हसीनांना पळून जावे लागले. भविष्यकाळामध्ये भारताला अधिक जागरूक भूमिका घेऊन चीन व पाकिस्तानपासून बांगलादेश मुक्त कसा ठेवता येईल यासाठी अधिक गांभीर्याने प्रयत्न करावे लागतील. दक्षिण आशियातील प्रमुख देशामध्ये चीनच्या ज्या कारवाया चालू आहेत त्या कारवायांना वेळीच वेसण घालणे महत्त्वाचे आहे. हाच बांगलादेश प्रकरणापासून भारताला धडा घ्यावा लागेल.

(लेखक आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत)