धुळे महानगरपालिका निवडणूक.. शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। धुळे

महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेतर्फे प्रभाग 5 मध्ये राजेंद्र रघुवीर पाटील, योगिता सुनील पाटील, ज्योत्सना प्रफुल्ल पाटील आणि दिगंबर भिका चौधरी हे उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करतांना उमेदवारांसह शेकडो कार्यकर्ते होते. त्यामुळे या प्रभागात निवडणुकीच्या वातावरणास सुरुवात झाली.

महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. परंतु त्याच वेळी पक्ष कार्यालयात बैठक घेऊन शिवसेनेने काही उमेदवारांना स्पष्ट संकेत दिले. महापालिकेच्या प्रभाग 3 मधून सोमवारी शिवसेनेतर्फे देविदास खंडू लोणारी, रफीक लुकमान पठाण आणि सगीराबी युसुफ खान या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नवरंग जलकुंभाच्या पायथ्याशी असलेल्या कार्यालयात या तिन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या प्रभागातून चारजणांची निवड केली जाणार आहे. शिवसेनेतर्फे लवकरच चौथ्या उमेदवाराची निवड होईल. यासंदर्भात देविदास लोणारी यांनी सांगितले की, प्रभाग 3 मध्ये हिंदू-मुस्लिमांची मिश्र वसाहत आहे. ऐंशी टक्के समाजकारण करताना शिवसेनेने मुस्लिम बांधवांसाठी वेळोवेळी संघर्ष केला आहे. त्यामुळे दोन मुस्लिम उमेदवार घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. पक्षाचे आजवरच काम लक्षात घेता प्रभाग 3 मधून शिवसेनेचेच उमेदवार विजयी होतील असा आत्मविश्वास लोणारी यांनी व्यक्त केला.

प्रभाग 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पूनम जितेंद्र शिरसाठ यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. विसर्जित होत असलेल्या महापालिकेत जितेंद्र शिरसाठ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. प्रभाग रचनेमुळे महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर जितेंद्र शिरसाठ यांची कन्या पूनम निवडणूक रिंगणात आहे. शहरातीलच प्रभाग क्रमांक 15 मधून जितेंद्र विनायक घोरपडे आणि सचिन आखाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

50 इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दाखल

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी 50 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी 7 इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. महापालिकेच्या 19 प्रभागांमधून 74 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करावयाची मुदत 20 नोव्हेंबरला दुपारी 3 ला संपुष्टात येत आहे. दरम्यान आयोगाची वेबसाईट धीम्या गतीने काम करीत असल्याने ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यास दुपारी सुरुवात झाली. त्यामुळे आता ठिकठिकाणच्या उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या मतदान केंद्रावर अखेरच्या दिवशी मंगळवारी इच्छुकांची गर्दी उसळेल.