
ठाकरे एकत्र येऊ शकतात तर आपण का नाही? असे मी बोललो होतो, मात्र अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत माझ्याशी कधीही बोलले नाहीत. याबाबत माझ्यासहित कुणालाही कल्पनाही नाही. जे काही करायचे असेल ते भाजपला आणि शिंदे गटाला विचारून करावे लागेल, अशी भूमिका अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.
आज आम्ही महायुती सरकारमध्ये आहोत. त्यामुळे जे काही करायचे ते आम्हाला भाजपसोबत राहून करायचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत काही करायचे असले तर त्याबाबत आम्हाला भाजपला विचारावे लागेल. कोणाला घ्यायचे, कोणाला नाही घ्यायचे याबाबत भाजपच्या ज्येष्ठ मंडळींनाही विचारावं लागेल. मुख्यमंत्र्यांना तर विचारावेच लागेल ना? कारण त्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
जर सरकारमधून बाहेर पडायचे असेल, एनडीएबरोबर जायचं नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे, मात्र अजितदादांनी महायुती सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार केला असेल असे आम्हाला वाटत नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
राजकारणात पुढे काय होईल माहीत नाही
प्रत्येकजण आपापल्या परीने बोलत आहेत. राजकारणात पुढे काय होईल माहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही आता काम करत आहोत. जो काही निर्णय करायचा त्याबाबत पक्षाचे नेते चर्चा करून निर्णय करतील, असे भुजबळ म्हणाले.
विलीनीकरणाबाबत जयंत पाटील बोलले होते
अजितदादा आणि त्यांची विलीनीकरणाबाबत चर्चा झालेली आहे, असे जयंत पाटील मला बोलेले होते, मात्र अजितदादा यांची आमच्यासोबत काहीच चर्चा झालेली नव्हती, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजितदादांचं दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याबाबतचं वक्तव्य मी ऐकलं होतं, मात्र आम्ही एनडीएमध्ये आहोत. त्यांच्या संमतीशिवाय असे काही घडले असते का, असा प्रश्न मुश्रीफ यांनी केला.


























































