गणेश चतुर्थी दिवशी शनिवारी मोठ्या दिमाखात घराघरात विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणरायाला आज मुंबई, महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. ‘सर्वांना सुखी ठेव, सर्वांचे भले कर… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ असा जयघोष करीत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले.
मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शनिवारपासून गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. घराघरात विराजमान झालेल्या बाप्पांची मनोभावे पूजा करण्यात येत आहे. यामध्ये दीड दिवसांच्या घरगुती आणि काही सार्वजनिक बाप्पांचे आज विसर्जन करण्यात आले.
मुंबई शहर आणि उपनगरात रात्री 10 वाजेपर्यंत 38 हजार बाप्पांचे विसर्जन आज करण्यात आले. यात 195 सार्वजनिक गणपतींचा समावेश होता. विसर्जनासाठी चौपाट्यांपेक्षा कृत्रिम तलावाला मुंबईकरांची पसंती होती. सुदैवाने गणेश विसर्जनात मुंबईत पुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात 85 हजार बाप्पांना निरोप
ठाणे, रायगड आणि पालघर जिह्यांत विविध ठिकाणी आज दीड दिवसाच्या सुमारे 85 हजार बाप्पांना निरोप देण्यात आला. ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील नऊ विसर्जन घाटांबरोबर पाच कृत्रिम तलाव, 10 मूर्ती स्वीकृती केंद्र आणि सहा फिरत्या विसर्जन तलावांची व्यवस्था केली होती. शहरात आज सुमारे 15 हजार बाप्पांना भाविकांनी निरोप दिला. नवी मुंबई शहरात 22 नैसर्गिक तलावांबरोबर 136 कृत्रिम तलावांवर विसर्जनाची व्यवस्था केली होती. शहरात आज सुमारे 10 हजार बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी 27 हजार, पालघर जिल्ह्यात पाच हजार, कल्याण आणि डोंबिवली शहरात 13 हजार, भिवंडी शहरात 10 हजार आणि भाईंदर शहरात 11 हजार गणरायांना आज निरोप देण्यात आला.
मुंबईत असे झाले गणपती विसर्जन
सार्वजनिक गणपती 195
घरगुती गणपती 37,879
हरितालिका 20
एकूण 38,094