सर्वत्र चिंतेचे ढग, हवामान खात्याचे मात्र ‘हवा’बाण

rain-sky

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईकरांसाठी पालिकेने भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव कोटय़ातील पाणी वापरण्यास सुरुवात केली आहे. पाणीपुरवठा होणाऱया सातही तलावांत या वर्षी पाणीसाठा कमी असल्यामुळे हे राखीव कोटय़ातील पाणी वापरण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांत मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी पाणीसाठा कमी असल्यामुळे पालिकेने नोव्हेंबर 2018 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू केली आहे. दरवर्षी जूनच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत पावसाची हजेरी लागते. यंदा जूनच्या अखेरच्या आठवडय़ापर्यंतही पावसाचा पत्ताच नसल्याने पाणीपुरवठा करताना पालिका चिंतेत पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया सात धरणांपैकी मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, तुळशी आणि विहार या धरणांमध्ये फक्त 73 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या मालकीच्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांतून राखीव साठय़ाचे पाणी पालिकेला घ्यावे लागते आहे. भातसा आणि अप्पर वैतरणा या राज्य सरकारच्या तलावांतून मुंबईसाठी रोज अडीच हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठय़ाचा वापर सुरू करण्यात आला आहे.

भातसामधून दोन हजार दशलक्ष लिटर आणि अप्पर वैतरणातून 500 दशलक्ष लिटर पाणी पालिकेकडून दररोज उचलले जात आहे. म्हणजे मुंबईला दररोज पाणीपुरवठा केल्या जाणाऱया 3500 दशलक्ष लिटर पाण्यापैकी सुमारे 70 टक्के पाणी सध्या भातसा आणि अप्पर वैतरणातून घ्यावे लागते आहे. हे पाणी जुलैपर्यंत पुरणार आहे. दरम्यान, दाखल झालेला मान्सून तलाव क्षेत्रातही लवकरच बरसणार असल्यामुळे मुंबईकरांवर अतिरिक्त पाणीकपात लादावी लागणार नाही असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

जून महिना संपत आला तरी महाराष्ट्रात मुसळधार पावसाची सुरुवात झालेली नाही. मान्सूनने महाराष्ट्र व्यापला असा दावा हवामान खाते करीत असले तरी शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वत्र चिंतेचे ढग असताना हवामान खात्याकडून मात्र रोज ‘हवे’त बाण सुरू आहेत. नेमका पाऊस कुठे लपून बसला याचा पत्ता हवामान खात्यालाही सापडलेला नाही.

‘वायू’ चक्रीवादळामुळे सुरुवातीला मान्सूनचा मार्ग अडवला गेला होता. केरळमध्ये उशिरा दाखल झालेल्या मान्सूनची वाट अडखळतच सुरू आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात एखाद्या तालुक्यात जोरदार पाऊस झाला तरी बहुतांशी भागात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

बुधवारची प्रतीक्षाही खोटी ठरली

मुंबईत 26 जूनला मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तवला होता. मात्र, चार दिवसांनंतर तो अंदाजही आज खोटा ठरला. याबाबत विचारले असता मुसळधार पावसासाठी आणखी दोन-तीन दिवस वाट पाहावी लागेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

मुळात मान्सून केरळमध्ये दाखल व्हायलाच दोन आठवडे उशीर झाल्याचा फटका सगळय़ा देशाला बसला आहे. दक्षिण गोव्यापासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून आता गोव्यात पाऊस सुरू झाला आहे. मात्र, तो महाराष्ट्राच्या वाटय़ाला कधी येईल, याबाबत मात्र, कोणतीही ठोस भूमिका न घेता हवामान खाते ‘अंदाज पे अंदाज’ मांडत नाही.