बच्चे कंपनीसाठी डिजिटल संस्कारक्षम पाठशाळा! अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या मूल्य शिक्षण उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या संस्कारक्षम कथांच्या  डिजिटल स्वरूपाचे लोकार्पण सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आणि भजन सम्राज्ञी अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळ सभागृहात विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे यूटय़ूब आणि फेसबुक माध्यमाद्वारे प्रसारणही करण्यात आले.

https://youtu.be/cfe7OxEt6Pw

संस्कृती  संवर्धन प्रतिष्ठानतर्फे इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला हा उपक्रम महाराष्ट्र, गोवा,राजस्थान आणि केरळ राज्यांतील 900 शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे, अशी माहीती प्रतिष्ठानचे विश्वस्त-सचिव मोहन सालेकर यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी बोलताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, ‘सेवाभाव हा आपल्या संस्कृतीचे आणि संस्कारांचे अभिन्न अंग आहे. म्हणूनच मानवतेच्या कल्याणासाठी या संस्कृतीचे आणि संस्कारांचे जतन आपण केले पाहीजे. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान याच जीवनमूल्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत आहे. संस्कारक्षम कथांचा अमूल्य ठेवा दृकश्राव्य माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना देण्याच्या प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना प्रत्येक संस्कृतीप्रेमी संवेदनशील व्यक्तिने साथ द्यावी’ असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात सहाय्यक पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी, शिक्षणतज्ञ डॉ. विजय मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दीपिका गावडे यांनी, तर अस्मिता आपटे यांनी प्रास्ताविक सादर केले.