डिजिटल वारी – अभंग, निरुपण अन् कॅलिग्राफी यांचा संगम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येकाने एकदा तरी ही वारी अनुभवायला हवी, असं म्हटलं जातं.  कोरोनामुळे शतकानुशतकांच्या वारी परंपरेत गेली दोन वर्षे खंड पडला होता. या काळात डॉक्टरांची डिजिटल वारी सुरू होती. दिंडीतील प्रसंग, त्या अनुषंगाने समर्पक अभंग आणि कॅलिग्राफी असे या डिजिटल वारीचे स्वरूप होते. या वर्षी वारी प्रत्यक्ष सुरू आहे, तरीही डिजिटल वारीचा प्रवास सुरूच आहे. 

गेली 24 वर्षे वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टतर्फे दिंडी मार्गावर वैद्यकीय शिबीर घेतले जाते. कोरोनाच्या काळात वारीला जायला मिळाले नाही, याची खंत भक्तांच्या मनात होती तशीच नियमित आरोग्यसेवा देणाऱया डॉक्टरांच्या मनातही होती. म्हणून डॉ. नरेंद्र कदम आणि डॉ. तेजस लोखंडे, त्यांना भावलेली वारी डिजिटल स्वरूपात सोशल मीडियावर पोस्ट करत होते. दिंडीतील प्रसंग लिहून त्याअनुषंगाने समर्पक अभंग आणि त्यावरचे निरूपण तसेच डॉ. तेजस लोखंडे यांची कॅलिग्राफी असे या डिजिटल वारीचे स्वरूप होते. ही संकल्पना लोकांना आवडली. त्यानंतरच्या वर्षी वारी म्हणजे काय, ती कशी असते? तिचे नियोजन, व्यवस्थापन कसे असते? याबद्दलचे लिखाणही पसंतीस उतरले.

यंदा आमचीही प्रत्यक्ष वारी घडणार असल्यामुळे सगळ्यांच्या अंगात वेगळा उत्साह संचारला आहे. आमच्या अंगात डिजिटल वारी भिनल्यामुळे हा प्रवास दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानापासून आषाढी एकादशीपर्यंत लोकाग्रहास्तव सुरू राहणार आहे, असे डॉ. तेजस लोखंडे यांनी सांगितले.

वारी जनातली, जनांच्या मनातली

नुकतेच डॉ. नरेंद्र कदम आणि डॉ. तेजस लोखंडे यांच्या ‘वारी जनातली, जनांच्या मनातली’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. वारीचा इतिहास काय? ज्ञानेश्वरी माऊली वारी करत होते काय? पालखी सोहळ्यात दिंडीचा कार्यक्रम कसा असतो? प्रत्येक दिंडीत अभंग, भजने कोणत्या क्रमाने गायली जातात? माऊलीचा रथ कसा आहे? त्याला ओढणारे बैल कोणाचे असतात? माऊलीचे अश्व कुठून येतात? रिंगण सोहळे किती, कसे आणि कुठे होतात? परतवारी म्हणजे काय? अशा अनेक न सुटलेल्या प्रश्नांची उकल या पुस्तकातून होते.

कोरोनाचा दोन वर्षांचा काळ सोडला तर गेल्या 24 वर्षांत डॉक्टरांनी त्यांना दिसलेली वारी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न डिजिटल वारीतून केला आहे.