
ईडी, सीबीआय आणि आयटी ही केवळ राजकीय शस्त्रे बनली आहेत, अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचा आज प्रकाशन सोहळा दिल्लीतील कॉन्स्टिट्यु क्लब, मावळणकर सभागृह येथे पार पडला. यावेळी बोलताना ते असे म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले की, “संजय राऊतजी तुमच्यासारखे शूर आणि कौतुकास्पद लोक आता खूप कमी उरले आहेत. नाहीतर आज परिस्थिती अशी आहे की, मोठे नेते, मोठे अधिकारी किंवा ज्यांना आम्ही आमच्या आजूबाजूला पाहिले आहे, त्यांच्याकडे नोटीस गेल्यावर त्यांना बसा असे सांगितले की ते बसतात. तुमचे धैर्य, तुमची कर्मठता आणि तुमचे आदर्श बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती असलेले तुमचे समर्पण हे याचेच प्रतीक आहे की, तुम्ही तुरुंगात जाणे पसंत केले पण तडजोड केली नाही. अशा लोकांसाठी तुमचे मनापासून अभिनंदन. अरविंद जी देखील इथे आहेत, त्यांनीही तडजोड केली नाही.”
दिग्विजय सिंह म्हणाले “मी मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल थोडे जाणून आहे, कारण ते आमच्या शेजारच्या राज्यातले आहेत. त्यांचा ‘गव्हर्नन्स मॉडेल’ वेगळा आहे. त्यांनी म्हटले होते की खाऊंगा ना खाने दूंगा, पण प्रत्यक्षात तिथे वेगळेच घडते. म्ही तुमच्या पुस्तकात बिझनेस पॉलिटिक्स ऑफ गुजरातचा उल्लेख केला आहे. तिथल्या एका मोठ्या अधिकाऱ्याने मला सांगितले होते की, त्यांचे मॉडेल सोपे आहे. एखाद्या अधिकाऱ्याला काम दिले आणि त्याने ते केले तर तो ‘ए’ कॅटेगरीचा, बघतो म्हणाला तर ‘बी’ कॅटेगरीचा आणि नियमांवर बोट ठेवले तर तो ‘सी’ कॅटेगरीचा ठरतो. जो ‘ए’ कॅटेगरीचा असतो, तो त्यांच्या भ्रष्टाचार आणि गुन्ह्यांमध्ये भागीदार बनतो. जसे आमच्या चंबळ भागात डाकूंच्या टोळीत सामील व्हायचे असेल, तर कोणाला तरी मारून किंवा पकडून यावे लागते, तसेच हे आहे. आधी तुम्ही भ्रष्टाचार करा, मग तुम्ही त्यांच्या पार्टनर यादीत सामील होता. एकदा त्यात सामील झालात की मग तुम्हाला कोणीही हात लावू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले की, “आज ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि आयटी (IT) ही केवळ राजकीय शस्त्रे बनली आहेत. त्यांनी नोंदवलेल्या प्रकरणांपैकी १० टक्के देखील सिद्ध झालेले नाहीत, फक्त तुरुंगात पाठवले जाते. तुरुंगात जे काही घडते, ते तुम्ही तुमच्या पुस्तकात मांडलेच आहे. तुम्ही कसाबच्या बिर्याणीचा जो किस्सा सांगितला आहे, तो आता हेडलाईन बनला आहे. कसाबला बिर्याणी दिली जात असल्याचा तो केवळ एक खोटा प्रचार होता, हे तुम्ही उघड केले.”



























































