पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम प्रभावी होईल- माजी खासदार दिलीप गांधी

‘सर्वसामान्यांच्या नेतृत्वाचा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत. पक्षाने राष्ट्रीय महामंत्रीसारखे मोठय़ा जबाबदारीचे पद देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजपचे काम अधिक प्रभावी होईल,’ असे म्हणत माजी खासदार दिलीप गांधी यांनी राज्यातील विद्यमान नेतृत्वाविरोधातील खदखदच बोलून दाखविली आहे.

पंकजा मुंडे या गोपीनाथगडावरील दसरा मेळाव्याचा कार्यक्रम उरकून पुण्याला जात असताना माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी थांबल्या होत्या. त्यावेळी माजी खासदार गांधी यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. शेतकरीही अतिवृष्टीमुळे संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने संकटकाळात जनतेला जास्तीत जास्त मदत करणे गरजेचे आहे. शेतकऱयांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचे स्वागत करते. मात्र, याहून अधिक मोठे पॅकेज देणे अपेक्षित होते,’ असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी खासदार असलेल्या दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखे यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतरही पक्षपातळीवर गांधी यांना डावलण्यात आले होते. त्यामुळेच त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करून राज्यातील नेतृत्वाला लक्ष्य केल्याची चर्चा जिह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या