
>>दिलीप जोशी<<
थंडीचे दिवस खरं तर सुखाचे. आपल्यासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशाला हिवाळय़ाचं खूपच अप्रूप! त्यातही दक्षिण हिंदुस्थानला जास्त. कारण हा भाग तुलनेने विषुववृत्ताच्या जवळचा. त्यामुळे सूर्य दक्षिण गोलार्धात गेला की थंडीचा अनुभव यायला लागतो तो या उन्हाळी प्रदेशात अधिक महत्त्वाचा. त्याचप्रमाणे कच्छ आणि राजस्थानच्या थर वाळवंटात मार्च ते सप्टेंबर या काळात असलेला उन्हाळा नंतर कमी होतो. लडाख, कश्मीरमध्ये तर डिसेंबर, जानेवारीत बर्फवृष्टीच होते. हा काळ महाराष्ट्रात सुखद गारव्याचा. क्वचित कुठे तापमान शून्यावर जाऊन हिमकणांची चादर पसरण्याचाही चकित करणारा अनुभव येतो.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे थंडीचा हा मोसम आरोग्यदायी, सुखकारक, पर्यटनाला उत्तम. परंतु गेल्या काही दशकांत सबंध जगात थंडीच्या काळात प्रदूषणाचा त्रास अधिकाधिक जाणवू लागला आहे. हवेतील शीतलतेने प्रदूषक पदार्थ (पोल्यूटन्टस्) हवेच्या खालच्या थरात येतात. आपला वावर तिथेच असतो. त्यामुळे प्रत्येक श्वासाबरोबर आपण प्रदूषकं फुप्फुसात घेत असतो. मुंबईची अवस्था फार उत्तम नाही, पण दिल्ली या देशाच्या राजधानीच्या शहरात तर परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. परवाच बातम्यांमध्ये पाहिलं की, दिल्लीच्या हवेची पातळी अगदीच वाईट झालेली आहे. सकाळच्या वेळी काही मीटर अंतरावरचं दिसत नाही असं प्रदूषण. देशाच्या राजधानीची ही अवस्था तर बाकीच्या ठिकाणांचं काय!
मात्र आपल्यापेक्षाही भयंकर प्रदूषणाला तोंड देणारे अनेक देश आहेत. चीनची राजधानी बिजिंग आणि थायलॅन्डची राजधानी बँकॉक याला अपवाद नाहीत. चीनच्या महानगरांमधल्या वाहनांमुळे होणारं प्रदूषण इतकं पराकोटीला पोचलंय की, ते कसं दूर करावं ही समस्या त्यांना भेडसावतेय. बँकॉकमध्ये तर भर दुपारी सूर्यदर्शन घडणार नाही इतक्या दाट प्रदूषणाच्या ढगांची किंवा फॉगची (धुके) बातमी पाहिली. विमानातून पाण्याचे फवारे मारून हे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न चालला होता. रस्त्यावरची प्रत्येक व्यक्ती नाकावर ‘मास्क’ लावून फिरत होती. ‘प्रगती’च्या टप्प्यांवर असा प्रदूषणाचा भस्मासुर कधी काळी उपटेल याची कल्पना एकोणिसाव्या शतकात येणं शक्य नव्हतं. नुकताच खनिज तेलाचा वापर सुरू झाला होता. ‘मिट्टी’चं तेल म्हणजे अतिशय सुलभ इंधन होतं. लाकूडफाटा आणून, ढलप्या करून चूल पेटवण्यापेक्षा रॉकेलचे स्टोव्ह सोयीचे होते. त्याचवेळी रेल्वेशी स्पर्धा करणाऱ्या मोटारींचं इंधन म्हणून पेट्रोल मोठय़ा प्रमाणात वापरलं जाऊ लागलं. विजेचा शोध लागल्यावर वीजनिर्मितीसाठी दगडी कोळशाचा मोठय़ा प्रमाणावर वापर होऊन राख आणि धूर वातावरणात मिसळू लागला. याच दगडी कोळशावर भक् भक् करत आगगाडी धावू लागली. म्हटलं हे सारे माणसाच्या कर्तृत्वाचेच टप्पे. यातून खूप फायदाही झाला. वाहनं वेगवान बनली. बैलगाडी, घोडागाडी मागे पडली. अवजड वस्तू सहज वाहून न्यायला ट्रेनसारखं साधन नव्हतं. प्रवासासाठीही गाडी अत्यंत उपयुक्त ठरली. त्यानंतर आलेल्या मोटारी आधी प्रतिष्ठsचं आणि नंतर आवश्यक साधन बनलं.
प्रगतीची घोडदौड सुरूच होती. पेट्रोलपासून अणुशक्तीपर्यंत अनेक इंधन-स्रोतांनी क्रांती घडवली. त्यातल्या प्रदूषणाचं प्रमाण कमी-जास्त असलं तरी सतराव्या-अठराव्या शतकापर्यंत स्वच्छ असलेलं पृथ्वीभोवतीचं वातावरणाचं कवच काळवंडू लागले. फ्रीज, एसीमधला क्लूरोफ्लोरो कार्बन तर वातावरणाच्या वरच्या थरात जाऊन ‘ओझोन’ हा संरक्षक वायू नष्ट करू लागला. म्हणजे प्रदूषण कुठल्या ‘थरा’ला गेलं ते बघा! या सगळय़ाचा परिणाम आपल्यावरही होतोय. कधी कळत कधी नकळत. थंडीमध्ये शहरी भागात ऍलर्जी, सर्दी, खोकला, दमा अशा विकारांचा वाढता प्रादुर्भाव हेच दर्शवितो. काही दिवसांपूर्वी फुप्फुसाचा त्रास असलेल्या एका परिचिताची भेट झाली. प्राणवायू निर्मिती करणारं यंत्र बाजूला ठेवूनच त्यांना श्वास घेता येतो. असे काही तरुण रुग्णही आता दिसू लागलेत. यात प्रत्येक व्यक्तीच्या फुप्फुसाची क्षमता महत्त्वाची आहेच, पण वाढत्या प्रदूषणाचाही वाटा आहे. जगभर अनेक लोकांना श्वसनाचे त्रास जाणवतायत हे कशाचं लक्षण?
‘प्रगत’ जगाला हा चोरपावलांनी येणारा धोका आपल्याला कधी कळणार? जागतिक प्रदूषणावर चर्चा करणाऱ्या ‘वसुंधरा परिषदा’ भरतात, पण ‘प्रगत’ देशांकडून तरी त्यातील ठरावांची प्रभावी अंमलबजावणी होते का हा प्रश्नच आहे. विकसित देशांनी सुरुवातीच्या काळात भरपूर प्रदूषण करून ठेवलंय आणि आता तेच विकसनशील देशांना उपदेशाचे डोस पाजतायत. कोण कुणाचं ऐकणार? हे आपल्याला म्हणजे आधुनिक माणसाला कधी समजणार? या प्रश्नाचं उत्तरही शोधण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करतायत. या दृष्टीने रशियामध्ये एक आशादायी संशोधन होतंय. ‘सिल्व्हर कॅटॅलिस्ट’ किंवा चांदीच्या उप्रेरकांचा वापर करून हवेतील प्रदूषण करणाऱ्या ‘कार्बन’च्या कणांना आणि इतर प्रदूषकांना निप्रभ केलं जाऊ शकतं आणि या उप्रेरकाचे ‘नॅनो स्ट्रक्चर’ घरातली हवा शुद्ध ठेवण्यासाठीही वापरलं जाऊ शकतं असं रशियन तज्ञ दोन वर्षांपासून म्हणतायत.
प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे धास्तावलेल्या जगाला हा मोठाच दिलासा आहे. अन्यथा अंटार्क्टिका आणि आर्क्टिक प्रदेशातलं बर्फ वितळतंय. आपल्या हिमालयातले आणि युरोपातल्या आल्पस् पर्वतातले हिमकडे विलग होतायत. दिवसेंदिवस प्रत्येकाचा श्वास जडावतोय. या सर्व नकळत ग्रासणाऱ्या संकटांवर कोणी उपाय शोधत असेल तर आपण त्यांचं ऋणी राहायला हवं. खऱ्या अर्थाने ‘झाले मोकळे आकाश’ असा अनुभव आला तर आपल्या पुढच्या पिढय़ा सुखाने जगतील. त्यांच्या भवितव्याचा विचार आज, आताच व्हायला हवा आणि परिणामकारक कृतीसुद्धा!


























































