दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा; आज डिस्चार्जची शक्यता

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. उद्या, गुरुवारी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. दिलीप कुमार यांचे निकटवर्तीय फैसल फारुखी यांने हे ट्विट केले आहे.

बुधवारी दुपारी ट्विटरवरून दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबतचे अपडेट देण्यात आले आहेत. त्यात फैसल फारुखी यांनी म्हटलेय, ‘‘तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी खूप आभार. दिलीप कुमार यांच्या फुप्फुसात साचलेले पाणी यशस्वीरीत्या काढण्यात आले आहे. डॉ. जलील पारकर आणि डॉ. नितीन गोखले यांच्याशी माझे व्यक्तिगत बोलणे झाले आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.’’ श्वसनाचा त्रास होत असल्याने रविवारी सकाळी दिलीप कुमार यांना खारच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. वयोमानानुसार त्यांच्या फुप्फुसात पाणी जमा झाल्याचे निदान झाले होते. परवाच त्यांची पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या