
शिवसेनेची वाढलेली ताकद आणि विकासकामांमुळे शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. राष्ट्रवादीचे बार्शी येथील आमदार दिलीप सोपल तसेच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. शिवसेनेत येणारे सर्वच पदांचे, सत्तेचे हपापलेले आहेत असे नाही. ज्यांना प्रामाणिकपणे शिवसेनेचं काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांसाठी शिवसेनेचे दार उघडे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे नागनाथ क्षीरसागर यांच्यासह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते आज ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या सर्वांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेत एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेनेत येणाऱ्या सर्वांनाच तिकीट देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेत कुणालाही अंधारात ठेवून घेतलेलं नाही. शब्द देताना एकदा नाही, लाख वेळा विचार कर ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. एकदा शब्द दिला की तो पडू द्यायचा नाही. त्यामुळे सर्व चर्चा झाल्यानंतरच येणाऱ्यांना शिवसेनेत घेतलं आहे. पदाचे किंवा सत्तेचे हपापलेलेच शिवसेनेत येत आहेत असे नाही. ज्यांना ज्यांना प्रामाणिकपणे शिवसेनेचं काम करण्याची इच्छा आहे, त्या सगळ्यांसाठी शिवसेनेचे दार उघडे आहे. आता परिस्थिती चांगली आहे. नवीन सहकारी शिवसेना तसेच मित्रपक्ष भाजपमध्येही येत आहेत. यावेळी शिवसेना नेते परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
ब्रेकिंग न्यूज नव्हे, जोडणारी न्यूज
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, भास्कर जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश होणार का? ही ब्रेकिंग न्यूज कधी मिळणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, ही ब्रेकिंग न्यूज नसेल तर जोडणारी न्यूज असेल. जे काही प्रवेश होत आहेत ते सर्वांच्या साक्षीने होत आहेत. निवडणुका जनतेची मतं घेतल्याशिवाय लढवता येत नाहीत. जे आम्ही करू ते जनतेला सांगूनच करणार आहोत. तेव्हा थोडं थांबा.
पुणे जिल्हा बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आत्माराम कलाटे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कलाटे यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. ते पुणे डीडीसीचे अध्यक्ष होते. मुळशी आणि भोर तालुक्यात त्यांचा चांगला संपर्क आहे.
युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे, बाकी चर्चांना अर्थ नाही!
युतीच्या मनोमिलनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे कारण नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी मी, मुख्यमंत्री आणि अमितभाई यांची चर्चा झाली होती. त्यानंतर वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पुढची युती कशी असेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. युतीचा फॉर्म्युला हा तेव्हाच ठरलेला आहे. जबाबदार व्यक्तीनेच हे जाहीर केलेले आहे. त्यामुळे बाकीच्या चर्चेला काहीही अर्थ नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
























































