
पंजाब अलिकडच्या काळातील सर्वात मोठ्या पुराचा सामना करत आहे. त्यामुळे अनेकांना १९८८ च्या विनाशकारी पुराची आठवण येत आहे. संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेल्याने, राज्याला इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे.
पंजाबमध्ये पूरपरिस्थिती भयावह झाल्यावर, अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझने गुरुदासपूर आणि अमृतसरमधील सर्वात जास्त प्रभावित झालेल्या दहा गावांना दत्तक घेतले आहे. स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने, दिलजीत सध्या सुरू असलेल्या मदत कार्यात सक्रियपणे सहभाग घेत आहे. त्यांच्या टीमने सांगितले की सध्या त्यांचे लक्ष अन्न, स्वच्छ पाणी आणि उपचार यासारख्या आवश्यक गोष्टी पुरवण्यावर आहे.
दिलजीत दोसांझ व्यतिरिक्त, इतर अनेक सेलिब्रिटी मदत कार्यात मदत करण्यासाठी पुढे आले. हाऊसफुल ५ मधील आणि सध्या बागी ४ च्या प्रदर्शनाची तयारी करत असलेली अभिनेत्री सोनम बाजवा हिने इंस्टाग्रामवर एक भावनिक संदेश पोस्ट केला आहे.
या कठीण काळात, पंजाब आणि पुरामुळे बाधित झालेल्या सर्वांसाठी माझी संवेदना. येणारे फोटो खरोखरच हृदयद्रावक आहेत, परंतु मला आशा देणारी गोष्ट म्हणजे पंजाबने नेहमीच दाखवलेली एकता आणि चिकाटी. मी सक्रियपणे काम करणाऱ्या संस्थांना देणगी देऊन मदत करण्याचा माझा वाटा उचलत आहे आणि मी तुम्हालाही तुमचा वाटा उचलण्याचे नम्रपणे आवाहन करते. अभिनेता संजय दत्तने इंस्टाग्रामवर चिंता व्यक्त केली आहे. यात त्याने पंजाबमध्ये झालेल्या आपत्तीसाठी मी शक्य तितकी मदत करणार आहे असे म्हटले आहे.