मदुशंकाची हॅटट्रिक अन् झिम्बाब्वेच्या तोंडचा घास गेला, पाहुण्या श्रीलंकेची विजयी सलामी

दिलशान मदुशंकाने घेतलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा सात धावांनी पराभव केला. अटीतटीच्या लढतीत झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत झुंज दिली, मात्र अखेरच्या क्षणी मदुशंकाने कमाल केली. अखेरपर्यंत झिम्बाब्वेचा विजय जवळजवळ निश्चित वाटत असताना पाहुण्या श्रीलंकेने यजमानांच्या तोंडचा घास पळवत विजय संपादन केला. श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज मदुशंकाने शेवटच्या षटकात हॅटट्रिक घेऊन सामन्याचा निकाल बदलला.

पहिल्या सामन्यातील विजयासह श्रीलंकेने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेसाठी हीरो ठरलेल्या मदुशंकाने त्याच्या 10 षटकांत 4 बळी घेतले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 298 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला केवळ 8 बाद 291 धावा करता आल्या आणि 7 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.