
पुष्पा पार्क पादचारी भुयारी मार्गाचे रखडलेले रुंदीकरणासह मालाड पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील रखडलेली विविध विकाम कामे वेळेत पूर्ण करून या कामाच्या प्रगतीचा आढावा सादर करण्याचे आदेश उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.
दिंडोशी विधानसभा मतदारसंघात एमएमआरडीए, एसआरए, मुंबई महापालिका, वन विभागामार्फत विविध विकासकामे सुरु आहेत. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पर्यावरण मंत्री व उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती. बैठकीला आमदार सुनिल प्रभू, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश वाकाणी, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.
मालाड पूर्व कुरार गाव, हुमेरा पार्क येथील राणी सती मार्ग, मल्लिका हॉटेल ते दिंडोशी बस डेपो यांना जोडणारा रस्ता आणि या रस्त्याच्या पुढील टप्प्यात असणाऱया पात्र घरांचे स्थलांतर करुन प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसीत करण्याबरोबरच मालाड पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गाखालून मालाड रेल्वेस्थानक ते आप्पा पाडय़ाला जोडणाऱया पुष्पा पार्क पादचारी भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम, व गोरेगाव पूर्व येथील गोरेगाव – मुलुंड लिंक रोड विकासकामासाठी मुंबई महापालिकेने निधी मंजूर केला आहे. या भागातील उड्डाणपूल व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु करणे, कांदिवली लोखवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित रस्त्यासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भागात भुयारी मार्गाची आखणी, इतर भागातील पात्र घरांचे स्थलांतर, कुरार नाला पात्राचे रुंदीकरण, घरांचे स्थलांतर, संस्कार कॉलेज येथील नियोजित रस्त्याचा विकास, प्रकल्पबाधितांच्या घरांचे पुनर्वसन, पोईसर नदीच्या पात्रातील तसेच कुरार नाल्याच्या पात्रातील रुंदीकरण व या मार्गातील लोकांना पर्यायी घरे याच भागात देणे अशा विविध विकास कामांबाबत यावेळी चर्चा झाली. एमएमआरडीए, एसआरए, मुंबई महापालिका, वन विभागाने ही कामे वेगाने मार्गी लावल्यास प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन होऊन वाहतूक कोंडी दूर होईल असे आमदार सुनील प्रभू यावेळी म्हणाले.























































