
अतिवृष्टीच्या प्रश्नावरील अत्यंत महत्त्वाच्या लक्षवेधी सूचनेवरील उत्तर न आल्याने अखेर ही लक्षवेधी सूचना राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली, तर दुसरीकडे सरकारमध्ये समन्वय नसल्याने जायकवाडी धरण आणि गोदावरी नदीच्या पुराच्या प्रश्नावरील लक्षवेधी सूचना पुकारल्यानंतर पुनर्वसनमंत्र्यांनी जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित केल्याचे सांगून या लक्षवेधीवर उत्तर देण्यास नकार दिला. मदत-पुनर्वसन आणि जलसंपदा खात्यामधील विसंवाद, यामुळे समोर आला. त्यामुळे विधानसभेत अध्यक्षांबरोबरच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
राज्यातील अतिवृष्टीच्या प्रश्नासंदर्भात शिवसेना पक्षाचे भास्कर जाधव यांच्यासह जवळपास 50 सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. ही लक्षवेधी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात पुकारली. मंत्र्यांनी उत्तर वितरित केल्याचे सांगितले; परंतु प्रत्यक्षात कोणत्याच सदस्यांना उत्तराची प्रत मिळाली नसल्याचे भास्कर जाधव यांनी सभागृहात निदर्शनास आणून हरकत घेतली. लक्षवेधीवरील उत्तरच आले नसेल तर आम्ही प्रश्न कसे विचारायचे, असा सवाल त्यांनी केला. सभागृहात हे काय चाललं आहे? सरकार आणि मंत्र्यांमध्ये ताळमेळ आहे की नाही, अशी विचारण करत मंत्री मकरंद पाटील यांना त्यांना धारेवर धरले. तेव्हा ‘माझ्याकडे उत्तर आहे,’ असा खुलासा केला. परंतु सदस्यांनी ‘आम्हाला उत्तर मिळाले नाही,’ असे निदर्शनास आणले. अध्यक्ष नार्वेकर यांनी त्यावर नाराजी व्यक्त करत सदस्यांना उत्तराची प्रत मिळाल्याशिवाय लक्षवेधी सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट केले. अखेर कामकाजाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करत ही लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्यात आली.
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या प्रश्नावर विजयसिंह पंडित यांच्यासह अन्य सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील उत्तर मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील हे देणार असल्याचे कामकाजपत्रिकेत नमूद करण्यात आले होते. परंतु लक्षवेधी पुकारताच मकरंद पाटील यांनी लक्षवेधी जलसंपदामंत्र्यांकडे हस्तांतरित केली असल्याचे सभागृहात सांगितले, त्यामुळे हा गोंधळ वाढल्याने अध्यक्षांनी लक्षवेधी पुढे ढकलली.

























































