बीडीडी चाळींच्या कामातील गैरप्रकार; अभियंत्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वरळी

वरळी येथील बीडीडी चाळींच्या कामातील गैरप्रकाराची दक्षता पथकामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधित अभियंत्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली. वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी लेखी उत्तर सादर केले. बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामासाठी फेब्रुवारी व मार्च २०१६ मध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंत्यासह २२ अभियंत्यांनी बनावट निविदा व करारनामे करून वर्क ऑर्डर काढली. प्रत्यक्षात कामे न करता २२ कोटी रुपयांच्या बिलांचे धनादेश वटवून गैरव्यवहार केल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी दोन व शाखा अभियंता हे जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे लेखी उत्तरात नमूद केले.