एअर इंडियामध्ये सवलतींच्या तिकिटांचा काळाबाजार, 4 हजार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडियामध्ये सवलतीच्या विमान तिकिटांचा काळाबाजार समोर आला आहे. कर्मचाऱ्यांनी सवलतीची तिकिटे बाहेरील व्यक्तींना विकल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एअर इंडियाने 4000 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून तिकिटांचे पैसे वसूल करण्यात येणार आहेत. या कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून स्वतःच्या कोट्यातील तिकिटे बाहेरील व्यक्तींना विकली. प्रकरण उघडकीस आल्यानंतर कंपनीने सदर कर्मचाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली आहेत.

एअर इंडियाच्या ‘एम्प्लॉयी लीव्ह ट्रॅव्हल’ (ELT) धोरणानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षाला 14 मोफत विमान तिकिटे मिळतात. ही तिकिटे केवळ कर्मचारी आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठीच वापरणे बंधनकारक आहे. मात्र, 4000 कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले. अधिकृत कागदपत्रांमध्ये खोटी माहिती भरून अनोळखी व्यक्तींना नातेवाईक असल्याचे भासवून ही चढ्या दराने ही तिकिटे त्यांना विकली.

सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर एअर इंडियाने शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. दोषी कर्मचाऱ्यांकडून या तिकिटांच्या पैशांची वसुली सुरू करण्यात आली असून मोठा दंडही आकारला जात आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी कंपनीने नियमावलीत बदल केला असून आता कर्मचाऱ्यांना तिकिटे मिळण्यापूर्वी नातेवाईकांचे पुरावे आणि सविस्तर माहिती आगाऊ सादर करणे अनिवार्य असेल. या कारवाईमुळे एअर इंडियाच्या कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.