दिशा सालीयन मृत्यू प्रकरण, सीबीआय चौकशीची गरज नाही!

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालीयन हिच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा अशी मागणी करत हायकोर्टात अर्ज दाखल करणाऱया याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा देण्यास नकार दिला. याप्रकरणी माहिती हवी असल्यास संबंधितांने पोलिसांकडे जावे असे स्पष्ट करत हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली.

8 जून रोजी मालाड येथील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेऊन दिशाने आत्महत्या केली होती तर त्याच्या सहा दिवसांनंतर सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली. दोघांचाही मृत्यू संशयास्पद असून मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूबाबत सर्व बाजूंनी सखोल तपास केला नाही त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी।मागणी करत दिल्लीतील वकिल अॅड विनीत धंडा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी हायकोर्टाने याचिकाकर्त्याना फटकारले. तुम्ही कोण आहात? दिशा सॅलियनच्या मृत्यूमध्ये काही चुकीचे आढळल्यास तिचे कुटुंब कायद्यानुसार योग्य ती पावले उचलतील. जर तुम्हाला या प्रकरणी माहिती हवी असल्यास तुम्ही पोलिसांकडे जा असे हायकोर्टाने स्पष्ट केले व याचिका फेटाळून लावली.

आपली प्रतिक्रिया द्या