बदनामी थांबवा, नाहीतर आम्हालाही जिवाचे बरेवाईट करावे लागेल! दिशा सालियनच्या आईचा टाहो

दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचे राजकारण होत आहे. त्यामुळे दिशाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या नाहक बदनामीमुळे तिचे आई-वडील प्रचंड तणावाखाली आहेत. परंतु आज त्यांनी आपले मौन सोडले. आमच्या मुलीची अशी बदनामी का करताय, असा सवाल करतानाच ‘हे थांबवा नाहीतर आम्हाला आमच्या जिवाचे बरेवाईट करावे लागेल. तसे झाल्यास आरोप करणाऱयांना जबाबदार धरण्यात यावे’ असा इशारा देत दिशाच्या आईने प्रसारमाध्यमांसमोर आज अक्षरशः टाहो फोडला.

दोन वर्षांनंतरही दिशाच्या बदनामीचे सत्र सुरूच 

‘दिशाच्या मृत्यूला आता दोन वर्षे होत आली आहेत. मात्र तरीही नारायण राणे आणि नीतेश राणे यांच्याकडून तिच्यावर बदनामीकारक आरोप केले जात आहेत. पोलिसांनी केलेल्या सर्व तपासावर अविश्वास दाखवला जात आहे. यामुळे सालियन कुटुंबियांचे नातेवाईक आणि मित्रमंडळीही त्यांच्याकडे यायचे बंद झाले आहेत. समाज म्हणून आपण त्यांच्यामागे उभे राहण्याची गरज आहे. त्यामुळेच मी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर दिशाच्या वडिलांनी आम्हाला घरी भेटायला बोलावले. त्यांनी मला एका पत्राद्वारे तक्रारअर्ज दिला. त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल’, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी  दिशा सालियन हिचा बलात्कार करून खून करण्यात आल्याचे शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र दिशाच्या आईवडिलांनी त्यामागचे वास्तव आज जगासमोर मांडले. ‘मुलीच्या बदनामीने मनाला प्रचंड वेदना होत आहेत. आम्ही एकुलती एक मुलगी गमावली आहे. माझ्या मुलीवर ना बलात्कार झाला, ना तिचा खून झाला. ऑफिसमधील तणावामुळे दिशाने आत्महत्या केली. व्यावसायिक डील रद्द होत असल्याचे तिने घरी सांगितले होते.  राजकीय आरोपांमुळे तिच्या आत्म्याला शांती लाभणार नाही.आमच्याही डोक्यात आत्महत्येचे विचार येऊ लागले आहेत. शांततेने जगू द्या आम्हाला.’ असे सांगताना दिशाच्या आईचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते. आम्ही ज्यांना मतदान करतोय तेच आमच्या मुलीला बदनाम करत आहेत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

माध्यमांतून दिशावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज  मालाड येथे घरी जाऊन तिच्या आई-वडिलांची भेट घेतली. यावेळी दिशाच्या आईने त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.

दरम्यान, नारायण राणे आणि नीतेश राणे हे प्रसारमाध्यमांवर माझ्या मुलीची बदनामी करत असून त्यांनी हे आरोप थांबवावेत, अशी तक्रार दिशाच्या आई-वडिलांनी चाकणकर यांच्याकडे दिली.