आई-वडील विनवण्या करत होते मात्र त्यांना दया आली नाही, जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

सोमवारी दिंडोशीला ओव्हरटेक करण्यावरुन झालेल्या वादात एका तरुणाला बेदम मारहाण झाली. मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. मुलाला वाचविण्यासाठी आई-वडील विनवण्या करत होते मात्र जमावाला दया आली नाही.  या हत्येचा व्हिडीओ व्हायरल होत असून याप्रकरणी 9 जणांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिंडोशी पोलिसांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, मृत तरुणाचे नाव आकाश माईन आहे. आकाशचा रस्त्यात गाडी ओव्हरटेक करण्यावरुन काही लोकांशी वाद झाला होता. दरम्यान जमलेल्या लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण होत असल्याचे पाहून तिथे मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली. गर्दीत जमा झालेल्या लोकांनी त्याच्यावर हातसफाई करुन घेतली. पण त्याला जेव्हा गर्दीतून मारहाण होत होती, त्यावेळी त्याची आई आणि वडील त्याला सोडण्यासाठी लोकांकडे विनवण्या करत होते. माझ्या मुलाला वाचवा म्हणत त्याची आई मुलाला मार लागू नये म्हणून अंगावर झोपून त्याला घट्ट पकडून राहिली. मात्र जमलेल्या गर्दीने त्याला मारणे सोडले नाही. व्हिडीओमध्ये हाता-पाय पडून मुलाला सोडण्यासाठी वडील विनवण्या करताना दिसत आहेत. मात्र लोकं मुलाला मारतच राहीले, शिवाय त्याच्या वडिलांवरही हात उगारले. या सर्वात आकाशचा मृत्यू झाला.

दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा नोंदवला असून नऊ जणांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात उभे केले असता त्यांना 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.