दिव्यातील हजारो कुटुंबे होणार बेघर, कांदळवनावरील घरे रिकामी करण्याचे आदेश

1108

कांदळवनावरील घरे उद्यापर्यंत रिकामी करण्याचे आदेश

जिल्हाधिकाऱयांनी बजावली नोटीस

कांदळवनावर चाळी उभारल्याचे कारण दाखवत हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे फर्मान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून निघाले आहेत. त्यासाठी 9 डिसेंबरपर्यंत येथील रहिवाशांनी स्वतःहून घरे रिकामी करावीत, अन्यथा तहसीलदारांमार्फत बळजबरी घरे रिकामी करून बुलडोझर फिरवण्याचा इशारा देणारी सामूहिक नोटीस झळकवण्यात आली आहे. त्यामुळे येथे वर्षानुवर्षे राहणाऱया रहिवाशांचा संसार उघडय़ावर येणार असल्याने त्यांची झोप उडाली आहे. दरम्यान मुंब्य्रातील सरकारी जमिनीवर अनधिकृत इमले रचले जात असताना त्याकडे दुर्लक्ष करून दिव्यातील सर्वसामान्य मराठी कुटुंबांचा संसार उघडय़ावर आणण्याचा हा घाट घातला असून त्याला प्रचंड विरोध करण्याची तयारी येथील रहिवाशांनी केली आहे.

शिवसेनेचा कारवाईला विरोध

दिव्यात खाडीनंतर डंपिंग ग्राऊंड आहे. त्यानंतर या चाळी आहेत. त्यामुळे कांदळवनाचा प्रश्नच येत नाही. ही बांधकामे जर अनधिकृत आहेत, तर मग इतकी वर्षे जिल्हा प्रशासन झोपले होते काय, असा सवाल उपस्थित करून शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी या कारवाईला विरोध केला आहे. या शेकडो चाळींमध्ये सर्वसामान्य मराठी कुटुंबे राहत असून त्यांना बेघर होऊ देणार नाही. त्यासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिला आहे.

दिवा परिसरातील सर्व्हे क्रमांक 236, 79, 80 आणि 75 यावरील बांधकामे कांदळवन नष्ट करून उभारण्यात आली आहेत, असा दावा करत जिल्हाधिकारी कार्यालयाने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याची तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार आदिक पाटील यांनी दिवा परिसरात एका बॅनरवर जाहीर नोटीस लावून येथील रहिवाशांना 9 डिसेंबरपर्यंत घरे रिकामी करण्याची सामूहिक नोटीस बजावली आहे. तसे न केल्यास बळजबरी घरे रिकामी करण्यात येतील व तो खर्च घरमालकाकडून वसूल करण्यात येईल, अशी तंबीही दिली आहे. या नोटीसमुळे दिव्यात घबराट व संताप व्यक्त होत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या