अभिनेत्री आलिया भटने ‘जिगरा’ सिनेमाचे खोटे बॉक्स ऑफिस कलेक्शन घोषित केल्याचा आरोप अभिनेत्री, निर्माती दिव्या खोसलाने केला. नुकताच आलियाचा ‘जिगरा’ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमात बहीण-भावाची कथा आहे. ‘जिगरा’ने पहिल्या दिवशी 4.5 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगण्यात आलंय. मात्र हे फेक कलेक्शन असल्याचा दावा दिव्या खोसला हिने केलाय.
यासंदर्भात दिव्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्यात तिने रिकाम्या थिएटर फोटो शेअर केला आणि लिहिलंय, मी सिटी मॉलमधील पीव्हीआर थिएटरमध्ये ‘जिगरा’ सिनेमाची तिकिटं बुक केली. थिएटर पूर्ण रिकामे आहे. आलिया भटमध्ये खरंच ‘जिगरा’ आहे, जिने स्वतःच तिकिटे खरेदी करून खोटे कलेक्शन जाहीर केलंय. मला प्रश्न पडलाय की मीडिया शांत का आहे?
दिव्याच्या टीकेला आलियाकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. आलियाच्या ‘जिगरा’च्या वेळी प्रदर्शित झालेल्या राजकुमार रावचा ‘विकी और विद्या का वो वाला व्हिडीओ’ हा सिनेमा सध्या गाजतोय. या सिनेमाने पहिल्या दिवशी पाच कोटी रुपयांचे कलेक्शन केले.