
>> दिव्या सौदागर
पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांना आहे तसं स्वीकारण्याची तयारी नसली की, ते नातं फारसं तग धरून राहू शकत नाही. थोडासा संयम बाळगत समंजस स्वीकारासाठी नात्याला वेळ देणं गरजेचं असतं.
गौ रेशचं आणि आरतीचं (नावे बदलली आहेत) लग्न होऊन वर्ष होत आलेलं. तरीही त्या दोघांमधली दरी कमी होत नव्हती. लग्नाच्या आधीपासूनच गौरेश तसंही हे नातं मान्य करत नव्हता आणि आरतीचीही काही वेगळी मनःस्थिती नव्हती, पण वडीलधाऱयांचा मान राखत दोघंही नाखुशीनेच बोहल्यावर चढले होते.
गौरेश आणि आरती ही दोघंही सामान्य कुटुंबातली मुलं होती. गौरेशचं कुटुंब मुंबईमध्ये तर आरती ही दुर्गम अशा खेडय़ात राहणारी मुलगी होती. मुंबईत राहिल्यामुळे गौरेशच्या सहचारिणीबद्दलच्या कल्पना वेगळ्या होत्या. त्याला स्वतंत्र, शिक्षित आणि प्रगत विचारांची मुलगी हवी होती. मात्र आरतीला पाहिल्यावर, तिच्याशी बोलल्यावर त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. एकतर दोघांमध्येही नऊ वर्षांचं अंतर होतं. या मुलीशी आपलं जुळेल का? ही चिंता त्याला सतावू लागली.
तिकडे आरतीची मनःस्थिती काही वेगळी नव्हती. आरती ही स्वप्नाळू, थोडी अल्लड होती. ती आता कुठे पौगंडावस्थेतून बाहेर येत होती. गौरेशला पाहिल्यावर तिचा हिरमोड झाला. दोघंही पहिल्या भेटीत अवघडलेलीच होती. दोघांना घरातल्यांनी रीतीभातीच्या नावाखाली एकमेकांशी स्वतंत्र बोलायला दिलं नाही. त्यामुळे साहजिकच दोघांचा म्हणावा तसा संवाद झालाच नाही. लग्नानंतर गौरेश लगेच कामावर जायला लागला. त्याला आरतीमध्ये तसाही इंटरेस्ट नव्हता. नवऱयाने थोडा वेळ द्यावा, लाड करावेत असं वाटणारी आरती या वागण्याने दुखावली होतीच.
“इतकी बालिश आणि बावळट मुलगी आहे की, मला तिच्याशी बोलायची इच्छाही होत नाही.’’ समुपदेशन सत्राला आल्यानंतर गौरेश सांगत होता. “फिरताना हात पकडा आणि सेल्फी काढा यात बालिशपणा तो काय?’’ आरतीनेही आपली बाजू मांडली. “तुला मॅनर्स नसतील तरी मला आहेत.’’ आवाज चढवून जसा गौरेश बोलला तसं तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं. “म्हणून मी यायला तयार नव्हतो. काही लोक हे गावंढळच राहतात.’’ गौरेश धुमसत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून आरती अजूनच रडायला लागली. “मलाही इथे राहावंसं वाटत नाही. एकटं वाटतं. गावात मोकळेपणा होता.’’ एवढं बोलून तिने मनातला सल उलगडली आणि खरंही होतं ते. मुंबईत तिचा वेळ जात नव्हता. सगळी घरातली कामं सासूबाईंच्या मदतीने ती उरकून टाकायची आणि नंतर तिच्याकडे करण्यासारखं काहीही नसायचं. गौरेशचं तिच्याशी कमी बोलणं, अवास्तव अपेक्षा करणं, नवीन जागा, नवीन नाती आणि कमी वयात आलेली जबाबदारी या सगळ्या गोष्टी आरतीला झेपल्या नाहीत. सरतेशेवटी विसंवाद वाढला आणि दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
“हा निर्णय तुम्ही घेतलाय तर आता समुपदेशनाची गरज काय?’’ असं दोघांना विचारताच दोघंही शांत बसले. मग गौरेशने सुरुवात केली, “आम्ही घाई करतोय असं मला वाटलं आणि…’’ आरतीलाही हाच प्रश्न विचारताच तिनेही राजीखुशीने हा निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं, पण पुढे ती असंही म्हणाली की, “जर या नात्यात एकजण खुश नसेल तर नातं टिकवण्यात अर्थ नाही.’’ या वेळी मात्र गौरेशने चमकून तिच्याकडे पाहिलं. आरती समंजसपणे बोलतेय यावर त्याचा विश्वास नव्हता.
आरतीने त्याच्याकडे न बघता तिची बाजू मांडायला सुरुवात केली. “मॅम, मला मी व्यवस्थित माहीत आहे. थोडी बालिश आहे मी, पण कायम तशी राहणार नाही हेही मला माहीत आहे. माझ्या मैत्रिणींची लग्नाची गोष्ट ऐकून मी माझ्याही नवऱयाबद्दल काही कल्पना केल्या. जेव्हा वयाचा प्रश्न आला तेव्हाही मी मनाला समजावलं, पण हे स्वतचाच हेका घेऊन बसले आहेत. आज मला सासू-सासऱयांसारखी सांभाळणारी माणसं आहेत. मी का राजीखुशी घटस्फोट घेऊ? मला पुढे शिकायचंय, पण यांना माझी लाज वाटते हे कळल्यावर माझंही मन उडालंय.’’ आरती हे सर्व प्रांजळपणे बोलत होती.
“हे तुझे विचार आहेत?’’ गौरेशने मध्येच विचारलं. “हो.’’ म्हणत आरतीने दुसरीकडे पाहिलं आणि ती शांत बसली. गौरेश मग बोलता झाला….“तुझी ही बाजू आज कळतेय.’’… “मग तुझा फेरविचार काही आहे का?’’ असं त्याला विचारताच त्याने किंचित होकारार्थी मान हलवली.
वैवाहिक समुपदेशनामध्ये गौरेश-आरतीसारख्या जोडप्यांना समुपदेशन करताना एक गोष्ट सतत जाणवते की, पतीपत्नीच्या नात्यामध्ये मनमोकळा संवाद कमी झालेला आढळतो. शिवाय स्वप्नरंजनाची सवय ही नात्याला घातक ठरते. गृहीत धरलेल्या अवास्तव अपेक्षांमुळे इतर समवयस्क जोडप्यांशी तुलना केली जाते आणि हीच तुलना आणि जोडीदाराबद्दल बाळगलेली अपेक्षा संसार फुलण्याआधीच मोडून टाकते. त्यातही जोपासलेला ‘स्व’ अधिक घातक. “मी झुकणार नाही, मला कोणाची गरज नाही.’’ अशा प्रकारचे स्वप्रेरित संवाद पतीपत्नीच्या नात्याला मारक ठरतात.
गौरेशला सत्रामध्ये जाणवलं की, जितका त्याने आरतीबद्दल गैरसमज करून घेतला होता तितकी ती उथळ नाही. तिला समजून घेण्यासाठी ‘क्वालिटी टाईम’ काढणं गरजेचं होतं. त्यामुळे सत्रांमधील समुपदेशनाच्या आधारे गौरेशने आरतीविषयीचा दूषित पूर्वग्रह सोडला. आरतीनेसुद्धा तिच्यामध्ये अजून काही बदल केले. ती स्वतकडे, स्वतच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यायला लागली. त्या दोघांचं नातं बहरत होतं याचा प्रत्यय लवकरच आला जेव्हा गौरेशच्या डीपीमध्ये आरतीही दिसायला लागली.
आरतीने तेव्हा समाधानाने सांगितलं की, गौरेश आता स्वत पुढाकार घेऊन नात्यासाठी प्रयत्न करू लागला आहे. आता दोघेही जेव्हा येतात तेव्हा त्या दोघांच्याही नजरेत एकमेकांबद्दल आपुलकी आणि प्रेम असतं. गौरेशने कबूल केलं की, नातं टिकवण्यासाठी जोडीदाराला आहे तसं स्वीकारलं की, नातं आपोआप बहरतं.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]



























































