“उद्या दिवाळी आहे तेव्हा आम्हाला अभ्यंगस्नान घालावे !”

>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

मित्र मित्र जरि भांडती । तरी पुन: एक होती ।। १ ।।

दंपतीचा हो कलह । लवमात्र न तुटे स्नेह ।। २ ।।

देवभक्ताचे भांडणें । पराभक्तीचें तें ठाणे ।। ३ ।।

वासु म्हणे हा विनोद । देतो दत्ता परानंद ।। ४ ।।

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

चातुर्मास्य संपल्यानंतर दिवाळी ही येथेच करायची असे श्री स्वामी महाराजांनी ठरविले. त्या दिवाळीत भक्ताने श्रीभगवंतावर प्रेम केले तर श्रीभगवंत सुद्धा त्याच्या प्रेमासाठी किती आसुसलेले असतात. हे दाखविण एक नाट्य तेथे घडले.

नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी श्री स्वामी महाराजांना स्वप्नांत दुष्टांत देऊन सांगितले की , ” उद्या दिवाळी आहे तेव्हा आम्हला अभ्यंगस्नान घालावे !” हे ऐकताच श्री स्वामी महाराज म्हणाले , “संन्यासी असल्यामुळे शास्त्राज्ञेप्रमाणे आम्हला अग्रीला स्पर्श करता येत नाही. त्यामुळे ऊन पाण्याने स्नान घालणे आम्हांला शक्य नाही. सुगंधी तेलही आमच्या जवळ नाही. म्हणून अभ्यंगस्नाची सोय करू शकणार नाही तेव्हा उद्या सुद्धा थंड पाण्याने स्नान करूनच दिवाळी साजरी करावी लागेल. शिवाय माणगावांहुन निघताना आपणच सांगितले की , ‘रोज थंड पाण्याने स्नान घालून भस्म लावले की झाले! कोणतेही उपचार नकोत.’ असे सर्व पूर्वीच ठरलेले असतांना आज ही माग कशासाठी ? आपली कितीही इच्छा असली तरी संन्यासधर्मामुळे आप हौस आम्ही पुरवू शकत नाही तरी आपण रागावू नये!” दुसऱ्या दिवशी नर्मदेवर स्नान करून आल्यावर श्रीस्वामी महाराजांनी रोजच्याप्रमाणे देवांना थंड पाण्याने स्नान घालून त्यांना भस्मलेपन करून पूजा केली व ते नित्याच्या कार्यक्रमास निघून गेले देवांना राग आला व ते नर्मदेच्या पाण्यात जाऊन बसले.

नेहमीप्रमाणे स्नान करून, दुपारी श्रीस्वामी महाराजांनी भिक्षा मागून आणली हातपाय धुऊन आचमन करून देवांना नैवेद्य दाखविण्याकरिता ते मूर्तीजवळ गेले, तेव्हा त्यांना नेहमीच्या जागेवर मूर्ती दिसली नाही ‘देव कोठे गेले?’ असा त्यांना मोठा प्रश्न पडला. इतक्यात तोफेच्या स्फोटासारखा महाप्रचंड आवाज होऊन देव श्रीस्वामी महाराजांना म्हणाले, “आज दिवाळी आहे. काल आपणाजवळ आमची इच्छा प्रकट करून सुद्धा आपण आम्हला मंगलस्नान न घालता नैवेद्य दाखविता? आम्हांला नको तुमचा नैवेद्य आम्ही नैवेद्य स्वीकारणार नाही. काही नको आम्हाला तुमचे!” ते ऐकून श्रीस्वामी महाराज दिग्मुढ झाले. साध्या मंगलस्नानासाठी दत्तप्रभु आपल्यावर रागावले आणि ते नैवेद्य ग्रहण करीत नाहीत हे पाहून स्वामी महाराज घाबरून गेले. नैवेद्य तेथेच ठेवून ते पुन्हा नर्मदेवर आले तेव्हा पाण्यातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आवाजाच्या अनुरोधाने श्री स्वामी महाराज पाण्यात शिरले. इतक्यात पाण्यात लख्ख प्रकाश पडलेला दिसला व त्या श्रीदत्तप्रभूंची मूर्ती दिसली. त्या बरोबर त्यांनी त्या ठिकाणी वेगाने जाऊन बुडी मारली. मोठ्या प्रेमाने देवाची मूर्ती हातात घेऊन हृदयाशी धरली आणि ते पाण्यातून बाहेर आले.

यावेळी श्रीस्वामी महाराज नदीवर कशासाठी आले ? हे नेहमीच्या लोकांना नकळल्यामुळे श्री नानासाहेब वैगरे नित्याची मंडळी नदीवर जमा झाली. त्यांच्या हातांत देव्हायातील मूर्ती पाहून सर्वांनी आश्चर्याने चौकशी केली. तेव्हा श्रीस्वामी महाराजांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. देव व भक्ताच्या प्रेमाचे ते अपूर्व दर्शन पाहून सर्वाना अतीव आनंद झाला. देवांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ऊन, पाणी, सुगंधी तेल, पंचामृत इत्यादी स्नानाची तयारी सर्व मंडळीनी केली. मग अत्यंत प्रेमळ चित्ताने श्रीस्वामी महाराजांनी श्रीदत्तप्रभूंची महापूजा केली. आरती, मंत्रपुष्प झाल्यावर श्रीप्रभूंच्या लीलेचे वर्णन त्यानीं एक सुंदर अभंग रचून त्यांतून केले.

अनंतकोटी ब्रह्मांडनायक देवांच्या वैभवाला काहीच कमी नाही पण देव भक्त यांचे प्रेमाचे नाते. आज कलियुगातही आहे. हेच देवांनी या प्रसंगातून पुनश्च दाखवून दिले. चिखलदा येथील व्यंकटराव, नानासाहेब, गंगाधरपंत, बाळ वैद्य इत्यादी मंडळींना त्यांच्या प्राथनेवरून श्रीस्वामी महाराजांनी योगाचे शिक्षण दिले. आणि उपदेश केला की “सगुण परमेश्वराची उपासना करून माणसाने कृतार्थ व्हावे. सगुण उपासनेशिवाय अखंड ब्रह्मसाक्षात्कार होणार नाही. आपल्या सगुण रूपाचा व वेद – शास्त्रांचा अभिमान आहे. प्रजाजणांनी कायदे पाळले म्हणजे राजाला जसा आनंद होतो, तसाच संतोष शासन पाळल्याने ईश्वराला होतो. म्हणून शास्त्रज्ञा पाळून ईश्वराची सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे !”

आपली प्रतिक्रिया द्या