मुंबई किती ‘फुगवणार?’

>>ज्ञानेश्वर भि. गावडे<<

मुंबई हे शहर लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकाचे दाटीवाटीचे शहर आहे. या शहरात दर चौरस किलोमीटर जागेत ३१ हजार ७०० लोक राहतात. पहिला क्रमांक बांगलादेशाची राजधानी असलेले ढाका शहर असून तेथील लोकसंख्येची घनता ४४ हजार ५०० इतकी आहे. पहिल्या दहा क्रमांकांत तिसरे मेडलिन (कोलंबिया) १९,७००, मनिला (फिलिपाइन्स), काब्लॉका (मोरोक्को), लागोस (नायजेरिया), कोटा (राजस्थान, हिंदुस्थान), सिंगापूर, जाकार्ता (इंडोनेशिया) अशा उतरत्या क्रमाने ही जगातील दाटीवाटीची शहरे आहेत. त्या तुलनेत मुंबई हे शहर जगाच्या दृष्टीने किती गजबजलेले आहे ते लक्षात यावे. ही वस्तुस्थिती वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेच्या सर्वेक्षणात आढळलेली आहे. हिंदुस्थानात दाट वस्तीची अन्ये शहरे आहेत, परंतु भौगोलिक क्षेत्राबाबत मुंबईपेक्षा किती तरी विस्तृत आहेत. मुंबईतील धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. तिची लोकसंख्येची घनता जवळपास दर चौरस किलोमीटरला दोन लाख माणसांची आहे. झोपडय़ांची उंची वाढविण्याची परवानगी दिल्यामुळे बऱ्याच झोपडय़ा बहुमजली होत आहेत. २००० पर्यंतच्या झोपडय़ांना पक्की घरे देणे आणि नंतरच्या झोपडय़ांना नागरी सोयी उपलब्ध करून देण्याची सोय करणे राजकीय स्वार्थापोटी चालले आहे ते चिंताजनक वाटते. मुंबईची अशी चिंताजनक अवस्था असताना महाराष्ट्र शासन नवनव्या योजना आखून मुंबईतील लोकसंख्या वाढविण्याच्या विचारात आहे. मुंबईच्या नैसर्गिक ढाली असलेल्या खारफुटी आणि मिठागारांच्या जमिनीवर मोठमोठय़ा गृहयोजना राबविण्याच्या विचारात आहेत. त्याशिवाय लगत असलेल्या समुद्रात शहरातून जाणाऱ्या नदीनाल्यात आणि काठावर अधिकृत व अनधिकृत भराव टाकून एकीकडे लोकवस्ती वाढविण्याकडे दुर्लक्ष करणार, तर दुसरीकडे सवंग लोकप्रियतेच्या मोहापायी घरांची गरज असलेल्यांसाठी घरे बांधण्याच्या योजना आखत आहे. थोडक्यात मुंबईची वस्ती वाढविणार, परंतु मुंबईवर पडणारा सोयीसुविधांवरील ताण व पर्यावरण याचा विचार करणार नाही.