यंदा 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून अनंत चतुर्दशीपर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या लेखी अथवा तोंडी परीक्षा घेऊ नका, अशा सूचना सर्व शाळांना देण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि शशिकांत झोरे यांनी मुंबई विभागीय शिक्षण संचालक संदीप संगवे यांची भेट घेऊन थोडय़ाच दिवसांत येऊ घातलेल्या गणेशोत्सवात शालेय विद्यार्थ्यांच्या लेखी अथवा तोंडी परीक्षा घेण्यात येऊ नयेत, अशा सूचना शाळांना देण्याची मागणी केली. शिवाय यंदा गौरी-गणपती विसर्जन सहाव्या दिवशी होणार आहे. विद्यार्थ्यांना सर्वसाधारण गणपतीकरिता पाच दिवसांची सुट्टी असते; परंतु गौरी-गणपती विसर्जन झाल्याशिवाय गणपतीसाठी आपल्या मूळ गावी गेलेले विद्यार्थी-पालक परत येऊ शकत नाही. गणपतीची सुट्टी 5 ऐवजी 6 दिवस करावी अशी मागणीही करण्यात आली.
अनेक शाळांमध्ये सुट्टीनंतर पहिला दिवस शाळेत येणे बंधनकारक करण्यात येते. याबाबत युवासेनेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन मेल करून सहाव्या दिवशी सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली आहे; परंतु शक्य न झाल्यास विद्यार्थ्यांना सहाव्या दिवशी शाळेत येणे बंधनकारक करु नये, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.