धार्मिक तेढ निर्माण करू नका; यूएनचे श्रीलंकेला आवाहन

23

सामना ऑनलाईन । युनायटेड नेशन्स

श्रीलंकेत 21 एप्रिलला ईस्टरचा सण साजरा होत असतानाच आठ साखळी बॉम्बने देश हादरला होता. त्यानंतर श्रीलंकेत  दंगली उफाळल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या नागरीकांनी धार्मिक तेढ निर्माण करता कामा नये, असे आवाहन युनायटेड नेशन्सचे विशेष सल्लागार ऍडामा डेंग व कारेन स्मिथ यांनी केले. बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत उसळलेल्या  दंगलींबाबत संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांनी हे आवाहन केले आहे.

श्रीलंकेत अल्पसंख्याक असणाऱ्या जातींच्या लोकांवर असे हल्ले होणे ठीक नाही, असेही यूएनच्या या दोघा विशेष सल्लागारांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. ईस्टर संडेचा सण साजरा होत असताना चर्चवर झालेल्या हल्ल्यानंतर श्रीलंकेतील अल्पसंख्याक असणाऱ्या मुस्लिम समाजावर हल्ले होऊ लागले आहेत. हा जातीय तेढ कोणत्याही देशासाठी योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. श्रीलंकेत एखाद्या विशिष्ट समाजाचे प्राबल्य नाही. तेथे वेगवेगळ्या जाती आणि धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहात आहेत. असे असताना एखाद्या जातीला लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले चढवणे योग्य नाही. आता श्रीलंकेच्या सरकारने विरोधी पक्षांसह मिळून हा जातीय द्वेष मिटवण्याची आज खरी गरज आहे, असेही डेंग आणि स्मिथ यांनी म्हटले आहे.

‘लिट्टे’वर आणखी पाच वर्षांची बंदी  

लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (लिट्टे)वरील बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवण्याचा निर्णय केंद्रीय गृहखात्याने घेतला. ‘लिट्टे’ची भूमिका आजही हिंदुस्थानविरोधी असल्यामुळे ही बंदी वाढवण्यात आली आहे, असे पत्रक गृहखात्याने काढले.

तीन दहशतवादी संघटनांवर बंदी

राजधानीत झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटांत सहभागी असलेल्या स्थानिक नॅशनल तौहिद जमातसह जमाते मिल्लते इब्राहिम (जेएमआय) आणि विलायत अस सेयलानी (डब्ल्यूएएस) यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या