गोदी कामगार नेते मोहम्मद हनीफ यांचे निधन

अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे अध्यक्ष मोहम्मद हनीफ यांचे प्रदीर्घ आजाराने आज दुपारी कोचीन येथे निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हनीफ यांनी गोदी कामगार नेते कॉ. एस. आर. कुळकर्णी व कॉ. मनोहर कोतवाल यांच्याबरोबर प्रदीर्घ काळ गोदी कामगार चळवळीत काम केले. डॉ. शांती पटेल यांचे ते जवळचे सहकारी होते. कुळकर्णी यांच्यानंतर हनीफ यांनी गोदी कामगार महासंघाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात गोदी कामगारांचे दोन यशस्वी वेतन करार झाले होते.

हनीफ यांच्या निधनाने चळवळीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले, अशा शब्दांत ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. शेटये, कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, सरचिटणीस सुधाकर अपराज, चिटणीस विद्याधर राणे, ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष किशोर कोतवाल, सरचिटणीस केरसी पारेख, चिटणीस निवृत्ती धुमाळ यांनी गोदी कामगार व माथाडी कामगारांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे.