महिला सहकाऱ्यावर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

मुंबईतील एका रुग्णालयात डॉक्टरनेच महिला सहकाऱ्यावर अनेकदा बलात्कार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. तसेच त्या डॉक्टरने अनेकदा लैंगिक छळ केल्याचेही महिला डॉक्टरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्या डॉक्टरने कामाच्या ठिकाणी मद्यपान केल्याचेही महिला डॉक्टरने सांगितले. महिला डॉक्टरने तक्रार दाखल केल्यावर भायखळा पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. हे दोघे डॉक्टर रुग्णालयातील प्रसूती विभागात कार्यरत होते.

महिला डॉक्टरने कराडमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती मुंबईत आली. डिसेंबर 2018 मध्ये तिचे लग्न झाले. तिचा नवरा रायगड जिल्ह्यातील एका रुग्णालयात निवासी डॉक्टर आहे. ती डॉक्टर महिला सहकाऱ्यासोबत रुग्णालयाच्या वसतीगृहात राहत होती. महिला डॉक्टर आणि
31 वर्षीय आरोपी डॉक्टर रुग्णालयाच्या प्रसूती विभागात कार्यरत होते.

रुग्णालयाने डॉक्टरांना विश्रांतीसाठी एक खोली राखीव ठेवली होती. तक्रारदार महिलेला सप्टेंबर 2019 मध्ये आरोपी डॉक्टरांने नको त्या ठिकाणी स्पर्श केला. त्यानंतर चूकून धक्का लागल्याचे सांगत माफी मागितली. डिसेंबर 2019 मध्ये आरोपी डॉक्टरांने तक्रारदार महिलेवर जबरदस्ती करत तिला धमकावले.

31 डिसेंबर 2019 रोजी आरोपी डॉक्टर मद्यपान करून आला आणि तक्रारदार महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने महिला डॉक्टरचे अश्लील फोटो आपल्याकडे असल्याचे सांगत तिला धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या डॉ्कटरने अनेकदा तिचा लैंगिक छळ केला तसेच वारंवार शिवीगाळ केल्याचेही महिला डॉक्टरने तक्रारीत म्हटले आहे.

कोरोनाच्या साथीमुळे त्यांच्या कामाच्या विभागात बदल झाले. ऑक्टोबरमध्ये आरोपीने लायब्ररीत महिला डॉक्टरला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिला डॉक्टर रायगडला पतीकडे गेली. तिने पतीला विश्वासात घेत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघांनी पोलीस ठाण्यात डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. या प्रकरणी आणखी पुरावे गोळा केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या