आरोग्य – अस्थमा आणि प्रतिबंध

>> डॉ. छाया वजा

रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या मते, मध्यम ते गंभीर स्वरुपातील दमा असलेल्या लोकांना कोविड-19 संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. मुंबई – दमा हा श्वसनमार्गासंबंधी रोग आहे. यामुळे श्वास घेण्यात अडचणी, खोकला, छातीत घरघर आणि श्वसनासंबंधी इतर अडचणींचा त्रास होतो. हवेतील धुलीकण, प्रदूषक, धूर, परागकण यामुळे दम्याचा त्रास आणखी वाढू शकतो. अशा व्यक्तींनी संसर्गाची लागण होऊ नये याकरिता पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. दम्याच्या रुग्णांकडून आम्हाला अनेक फोन येतात. यात ज्यामध्ये रुग्णांना कोविड-19 सारखीच लक्षणेही दिसून येतात. हे रुग्ण मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा खचून जात असल्याने त्यांनी पुरेशी विश्रांती घेणे, ध्यान-धारणा करणे आवश्यक आहे. दम्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. म्हणून जर जवळील व्यक्तीला दम्याचा त्रास असेल तर त्या व्यक्तीची लक्षणे, त्यांना होणारा त्रास याची वेळोवळी नोंद ठेवा. त्यांना लागणाऱया औषधांची यादी देखील नियमितपणे सोबत ठेवा.

तपासणीकरिता जाताना देखील या व्यक्तींच्या सोबत रहा. घरच्या घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. गरज भासल्यास इनहेलरचा वापर करा. परिस्थिती नियंत्रणात नाही, असे वाटल्यास डॉक्टरांना फोन करा. आपल्या आजूबाजूला दम्याने ग्रासलेली व्यक्ती असेल तर घरी डीओडोरंट्स किंवा परफ्यूमची फवारणी टाळा. कारण यामुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. सुगंधाकरिता वापरली जाणारी एअर फ्रेशनर किंवा अगरबत्ती तसेच मेणबत्त्या वापरू नका. वेळोवेळी घर स्वच्छ करा. घरातील प्रदूषण आणि धूळ टाळा. खिडक्या बंद ठेवून घरात परागकणांची संख्या मर्यादित करण्याचा प्रयत्न करा. धूम्रपान करू नका किंवा लाकूड जाळू नका. जर एखाद्यास दम्याचा त्रास असेल तर त्याला पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा. दम्याचा त्रास होऊ शकतो अशा पदार्थांचे सेवन करणे टाळा. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, एडिटिव्ह पदार्थ खाणे टाळा. कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा. औषधांचे सेवन करणे टाळू नका.

(लेखिका अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमध्ये जनरल फिजीशियन आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या