
पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा राजकीय प्रेरित असून राजकीय भाषणाला गुन्हेगारी स्वरूप देण्याचा आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, असा दावा यूकेस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत भूमिका मांडली आहे.
भाजप नेत्यांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी ब्रिटन येथील डॉक्टर आणि यूटय़ूबर संग्राम पाटील यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना लुकआऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. याप्रकरणी संग्राम पाटील यांनी हायकोर्टात धाव घेत ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला, अॅड. उज्ज्वलकुमार चव्हाण आणि अॅड. आदित्य हिरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेप्रकरणी पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल करत या प्रकरणाचा तपास महत्त्वपूर्ण टप्प्यावर असून डॉ. पाटील यांच्या याचिकेला त्यांनी विरोध केला आहे. तसेच पंतप्रधान या घटनात्मक पदाची परदेशातून बदनामी करण्याचा हा एक संघटित प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी हायकोर्टात डॉ. पाटील यांनी पोलिसांच्या दाव्याला उत्तर देण्यासाठी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत पोलिसांच्या कारवाईला आक्षेप घेतला आहे.






























































