औषध साठ्यावरून डॉक्टरांना वेठीस धरू नका

शहरात तसेच ग्रामीण भागात खासगी डॉक्टरांकडे काही प्रमाणात औषधांचा साठा ठेवलेला असतो. हा साठा करू नये यासाठी फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज, महाराष्ट्र यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र जीवनावश्यक औषधांचा साठा डॉक्टरांकडे असणे आवश्यक असते. त्यामुळे फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज संघटनेने औषधांना आक्षेप घेऊन डॉक्टरांना वेठीस धरू नये, असा इशारा शिवसेनाप्रणीत डॉक्टर सेलने दिला आहे.

मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात मेडिकल स्टोअर्स असून या मेडिकल स्टोअर्सच्या ‘द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट्स’ संघटनेने डॉक्टर करत असलेल्या औषधांच्या साठ्याबद्दल आक्षेप घेऊन तसे निवेदन राज्य सरकारच्या ‘एडीए’ला दिले होते. त्यानुसार औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा आणि त्याअंतर्गत नियम खासगी डॉक्टरांची अनुसूची ‘के’ अनुषंगाने तपासण्या करून कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यास सांगितला आहे, मात्र याला शिवसेनाप्रणीत डॉक्टर सेलने आक्षेप घेतला आहे.

डॉक्टरकडे जे औषध 100 रुपयांना मिळते तेच औषध मेडिकल स्टोअर्सकडे 500 रुपयांना मिळते. ग्रामीण भागात तर डॉक्टर कोसो मीटर लांब असतो. अशा वेळी डॉक्टरकडे औषधांचा साठा असणे आवश्यक आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही डॉक्टरांना औषधांचा साठा करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे मेडिकल स्टोअर्सच्या संघटनेने स्वतःच्या स्वार्थासाठी डॉक्टरांना वेठीस धरू नये, असा इशारा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद जाजू यांनी दिला आहे.