Video – धक्कादायक! डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाच्या डोक्यात झाल्या अळ्या

बीडमध्ये शेळीला पाला टाकताना झाडावरुन पडून डोक्याला मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णावर उपचार करुन सात टाके देण्यात आले. मात्र त्यानंतर रुग्णाला वार्ड क्रमांक 5 मध्ये ठेवून त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या डोक्यात अळ्या झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. याकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

ज्ञानदेव निवृत्ती  वीर (वय 55,रा. पाली ता. बीड) हे  14 नोव्हेंबर रोजी शेतात शेळ्यांना पाला टाकत असताना झाडावरुन खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून जखमेवर सात टाके दिले. त्यानंतर त्यांना वार्ड क्रमांक 5 मध्ये हलविण्यात आले. त्यानंतर डॉक्टांनी त्या रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या जखमेत अळ्या झाल्याचे दिसून येत आहेत. त्या अळ्या जखमेतून बाहेर येत आहेत. याबाबत नातेवाईकांनी डॉक्टरांना माहिती दिली. त्यानंतरही डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. या प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. विविध अभियानांमध्ये बीडचे जिल्हा रुग्णालय आघाडीवर आहे. मात्र, प्रत्यक्षात रुग्णालयात रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या