घाम करी काम! कुत्रे शोधणार कोरोना रुग्ण!!

जास्तीत जास्त चाचण्या करूनही अद्याप कोरोना नियंत्रणात आलेला नाही. सध्या फक्त लक्षणे दिसणार्‍या व्यक्तींच्याच चाचण्या केल्या जात आहेत. लक्षणे दिसत नसलेले लाखो लोक कोरोना घेऊन जगभरात फिरत आहेत. त्यांच्यामुळेच कोरोनाला लगाम घालणे कठीण होऊन बसले आहे. त्यांना हुडकून काढण्यासाठी आता कुत्र्यांचा वापर होणार आहे. गर्दीमधूनही हे कुत्रे अशा लक्षणरहित कोरोनाबाधितांचा अचूक माग काढणार आहेत.

चिली या देशात कुत्र्यांना कोरोना रुग्णांचा शोध घेण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. पहिल्या स्टेजमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांना घामाच्या वासावरून अचूक ओळखण्यासाठी या कुत्र्यांना तयार केले जात आहे. चिलीची राजधानी सँटिगो येथील कॅराबिनिरो प्रशिक्षण केंद्रात लॅब्राडोर आणि गोल्डन रिट्राईव्हर्स जातीच्या चार कुत्र्यांना हे प्रशिक्षण दिले जात आहे.

कुत्र्यांची घ्राणेंद्रिये ही माणसापेक्षाही 50 पट अधिक तीव्र असतात. केवळ वासावरून कुत्र्यांनी गुन्हेगाराचा माग काढल्याची लाखो उदाहरणे जगात आहेत.

लॉकडाऊन उठल्यानंतर कुत्र्यांची भूमिका महत्त्वाची

लॉकडाऊन उठेल तेव्हा शाळा सुरू होतील. दुकाने उघडतील. त्यावेळी या प्रशिक्षित कुत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे असे चिलीच्या प्रशिक्षण केंद्राचे संचालक लेफ्टनंट कर्नल क्रिस्तियन यानेझ सांगतात. शाळा, विमानतळे, बाजारपेठा, बस डेपो अशा वर्दळीच्या ठिकाणीच त्यांना तैनात केले जाणार आहे. गर्दीमध्ये हे कुत्रे ज्यांच्यावर भुंकतील त्यांना तातडीने आयसोलेट करून त्याची चाचणी केली जाईल असे यानेझ यांनी सांगितले.

रुग्ण शोधून काढण्यासाठी कुत्र्यांचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मलेरिया, कर्करोग आणि पार्किन्सनसारख्या आजाराचे रुग्ण शोधण्यासाठीही कुत्र्यांचा वापर केला गेला होता.

आपली प्रतिक्रिया द्या