
गेला काही काळ विमानात प्रवासी किंवा हवाई कर्मचाऱ्यांसोबत त्रासदायक घटना घडण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या आठवड्यात दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या तरुणीसोबत छेडछाड झाली होती. त्यानंतर आता कतार एअरवेजच्या दोहाहून दिल्लीकडे येणाऱ्या विमानात हवाई परिचारिकेसोबत प्रवाश्याने गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे.
कतारची राजधानी दोहा येथून नवी दिल्ली येथे हे कतार एअरवेजचं विमान येत होतं. या विमानात सुमारे 200 प्रवासी प्रवास करत होते. विमानात जेवणाची वेळ झाल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर विमानात खाण्याचे पदार्थ वाटण्यात येत होते. खाण्याचा काउंटर घेऊन जाणाऱ्या हवाई परिचारिकेचा अचानक तोल गेला आणि ती प्रवाश्याच्या अंगावर पडली. हा प्रवासी दारूच्या नशेत होता. त्याने तिची मदत करायची सोडून तिला घट्ट पकडलं आणि तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.
तिने त्याच्या कचाट्यातून निसटायचा प्रयत्न केला पण त्याने तिला सोडलं नाही. अखेर जोर लावून तिने स्वतःला सोडवलं आणि नंतर वैमानिकाला याबाबत तक्रार केली. या प्रवाश्याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. या प्रवाश्याचं नाव आर. के. चौधरी असं आहे.



























































