
कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्यामुळे शहरात तीव्र संताप उसळला आहे. बुधवारी डोंबिवलीत संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बळी गेलेल्या निष्पाप जीवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून आज डोंबिवलीकरांनी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये नागरिक, व्यापारी, कारखानदार आणि शाळा 100 टक्के सहभागी झाल्या होत्या.
सकाळपासून डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसर तसेच अंतर्गत रस्ते शांत होते. नेहमी गजबजलेली बाजारपेठ आणि दुकानांची रांग पूर्णपणे बंद होती. विशेषतः डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातील दुकाने, बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होऊन दहशतवादविरोधात आपला रोष व्यक्त केला. संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा हकनाक बळी गेल्याने दोन दिवसांपासून डोंबिवलीत शोककळा पसरली आहे. नागरिक भावनाविवश होऊन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात आक्रमक आहेत. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या डोंबिवलीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता
एनआयएच्या पथकाने घेतली माहिती
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) ची टीम आज डोंबिवलीत दाखल झाली. या पथकातील अधिकाऱ्यांनी मोने, लेले आणि जोशी कुटुंबीयांची भेट घेऊन कश्मीरमधील हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. हल्ला नेमका कसा झाला, कोणकोणत्या ठिकाणी घडला, त्यावेळी उपस्थित कुटुंबीयांनी काय अनुभवले याची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिन्ही कुटुंबीय शोकाकुल अवस्थेत असून त्यांची मानसिकता उत्तर देण्यास तयार नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी चार दिवसांनी पुन्हा कुटुंबीयांची भेट घेऊन सविस्तर जबाब घेण्याचे ठरवले.