अदानीच्या स्मार्ट मीटरचा झटका 2 हजारांचे बिल 28 हजारांवर, डोंबिवलीच्या पलावामधील शेकडो रहिवाशांवर ‘वीज कोसळली’

डोंबिवलीतील आलिशान टाऊनशिप असलेल्या लोढा पलावा टाऊनशिपला अदानी कंपनीच्या स्मार्ट मीटरने चांगलाच झटका दिला आहे. ‘कासा-युनो’ या सोसायटीतील सदनिकाधारकांना आधी दोन ते अडीच हजार येणारे बिल स्मार्ट मीटर बसवल्यानंतर 20 ते 28 हजार येत आहे. प्रत्येक महिन्याला येणारी बिले पाहून शेकडो रहिवाशांवर अक्षरशः वीज कोसळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गृहकर्जाच्या ईएमआयपेक्षाही वीज बिल अधिक असून बिल भरण्यासाठीही कर्ज काढण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. जादा बिले येत असल्याची तक्रार करूनही महावितरण दाद देत नसल्याने रहिवासी घरे विकून जाण्याच्या तयारीत आहेत. तर वीज बिलांच्या भुर्दंडांमुळे घर खर्चाचे गणित कोलमडल्यामुळे अनेक भाडेकरू दुसरीकडे राहायला जात आहेत.

लोढा पलावा येथील फेज दोनमध्ये ‘कासा युनो’ ही आठ विंग असलेली सोसायटी आहे. सोसायटीमध्ये सुमारे 760 रहिवासी वास्तव्यास आहेत. त्यातील सुमारे 300 हून अधिक रहिवाशांना महावितरण कंपनीच्या टीओडी स्मार्ट मीटर बसवल्याने त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या सोसायटीत पूर्वी महावितरणचे साधे मीटर होते. तेव्हा त्यांना योग्य प्रकारे बिल येत होते. मात्र स्मार्ट मीटरच्या बिघाडामुळे दोन ते तीन हजारांचे बिल थेट 20 ते 28 हजार इतके येत आहे. ‘कासा युनो’ सोसायटी मधील सुमारे 300 रहिवाशांना मागील महिन्याचे वीज मासिक भाड्यापेक्षा जास्त किंवा त्यांच्या गृहकर्जाच्या हप्त्यापेक्षा जास्त आले आहे. त्यामुळे वीज बिल भरण्यासाठीही कर्ज घेण्याची वेळ काही रहिवाशांवर आली आहे. काही घरमालक मुंबई, पुणे, बंगळुरू तसेच परदेशात राहायला आहेत. त्यांनी सदनिका भाड्याने दिल्या आहेत. त्यांचे भाडे दहा ते पंधरा हजार आहे. मात्र भाडेकरूंना घर भाड्यापेक्षा अधिक वीज बिल येत असल्याने त्यांनी पलावामधील घरे सोडून दुसरीकडे राहायला जाणे पसंद केले आहे. याचा फटका घरमालकांना बसत असून भाडेकरू मिळत नसल्याने घराच्या कर्जाचा हप्ता कसा फेडायचा याची विवंचना आहे.

शून्य रीडिंग तरी 11 हजार बिल
विनयकुमार जयस्वाल न्युझीलंडमध्ये राहतात. त्यांचा पलावा येथील ‘कासा युनो’ मधील फ्लॅट गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. मार्चपर्यंत त्यांना सेवा शुल्क आणि किमान वापर म्हणून 300 ते 400 रुपये मासिक बिल महावितरणकडून येत होते. परंतु जेव्हापासून स्मार्ट मीटर बसवले तेव्हापासून त्यांना मीटरमध्ये शून्य रीडिंग दिसत असतानाही जून महिन्याचे ११ हजार रुपये बिल आले आहे. त्यामुळे बंद घराला इतके बिल येत असल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराचे उत्तम उदाहरण यापेक्षा दुसरे कोणते असू शकते, असा संताप जयस्वाल यांनी केला. मे महिन्यात आम्ही उन्हाळी सुट्टीसाठी संपूर्ण महिना बाहेर गावी होतो. तरीही आम्हाला मे महिन्याचे बिल १० हजारांपेक्षा जास्त आले आहे, असे पलावा सिटीतील अनेक रहिवाशांनी सांगितले.

आमचे वीज बिल पूर्वी दोन ते तीन हजार येत होते. आता ते बिल पाच ते सात पट येऊ लागल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. प्रशासनाने ही समस्या सोडवावी यासाठी 300 रहिवाशांचे निवेदन महावितरण कंपनीला दिले आहे.
अ‍ॅड. अमित शुक्ला, अध्यक्ष ‘कासा युनो’ सोसायटी.

जुन्या मीटरचे रूपांतर स्मार्ट मीटरमध्ये झाल्यामुळे वाढीव बिले येत आहेत. घराचा हप्ता भरू की वीज बिल भरू या विवंचनेत मी आहे. – बकुल भट्टाचार्य, रहिवासी

अधिकारी म्हणतात खराब नेटवर्क
पलावा भागात खराब नेटवर्कमुळे स्मार्ट मीटरमध्ये समस्या उद्भवली आहे. आम्ही काही भागात बुस्टर बसवले आहेत. आता फक्त 1400 टीओडी मीटरची समस्या आहे. ही समस्या पुढील काही दिवसांत संपेल. ज्यांनी जास्त बिल भरले आहे त्यांच्या पुढील बिलांमध्ये समायोजन किंवा कपात होईल, असे महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.