रेल्वे स्थानकालगत आठ प्रवेशद्वारे, पण ‘डोंबिवली’च गायब; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली रेल्वे स्थानकालगत लाखो रुपये खर्च करून आठ आकर्षक प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत. त्यांना नाट्यनगरी, क्रीडानगरी, साहित्यनगरी, उद्योगनगरी अशी नावे दिली आहेत, पण या प्रवेशद्वारांमधून ‘डोंबिवली’ ही अक्षरेच गायब झाली आहेत. रेल्वे प्रशासनाने तातडीने डोंबिवली हे नाव प्रवेशद्वारावर लावावेत, अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

डोंबिवली स्थानकाच्या दोन्ही बाजूंना मिळून एकूण आठ प्रवेशद्वारे आहेत, पण एकाही प्रवेशद्वारावर ‘डोंबिवली’ हे मूळ नाव दिसत नाही, यामुळे रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांची घेतली भेट

प्रमोद कांबळे यांनी मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना यांची यासंदर्भात भेट घेतली. तसेच वरिष्ठ मंडळ अभियंता शांती लाल यांच्यासह अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानकाच्या बाहेरील कमानीवर ‘डोंबिवली’ हे मूळ नाव तातडीने लिहावे असे निवेदन दिले आहे. तसेच अनेक महिन्यांपासून रेल्वे स्थानकातील कामे संथ गतीने सुरू असून रेंगाळलेल्या कामांना गती द्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास ‘शिवसेना स्टाइलने’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.