घर कामगार, ड्रायव्हरना अडवता येणार नाही! इमारतीतील ‘अडेलतट्टूं’ना सरकारची चपराक

910

दररोज नवनव्या रेसिपीज रांधणाऱ्या सौभाग्यवतींना आणि घरकामात मदत करणाऱ्या पतीराजांना दिलासा देणारी बातमी आहे. आता घर कामगार आणि ड्रायव्हरना सोसायटीत कामासाठी अडवता येणार नाही असा आदेशच राज्य सरकाने दिला असून इमारतीतील अडेलतट्टूंना चपराकच हाणली आहे.

कोरोनाचा शिरकाव झाला आणि मग जगण्याचे संदर्भच बदलले. लॉकडाऊन काळात सोसायटीचे गेट घर कामगार, ड्रायव्हर आणि इतर किरकोळ काम करणारे यांच्यासाठी बंद झाले. सर्व फॅमिली मेंबर्स घरातच कोंडले गेले. पतीराज वर्क फ्रॉम होम करता करता सौभाग्यवतींना घरकामातही मदत करू लागले. नेहमी नवनवीन रेसिपी करून सौभाग्यवतीही दमल्या. कामवाल्या बाईला सोसायटीने नो एण्ट्री केल्याने घरातील हिमालयाएवढय़ा कामाचा पसारा आवरताना ‘श्री आणि सौं’ची दमछाक होऊ लागली सर्वांत जास्त त्रास सहन करावाला लागला तो ज्येष्ठ नागरिकांना.

लॉकडाऊन हटले आणि अनलॉकचे पहिले पर्व सुरू झाले. आता तरी किमान घरकामगार, ड्रायव्हर यांना मुक्त प्रवेश मिळेल असे वाटत होते, पण सोसायटीतील काही अडेलतट्टू पदाधिकाऱयांनी स्वतःचेच नियम बनवले आणि कामवाली बाई सोसायटीत नकोच अशी भूमिका घेतली.

पदाधिकाऱयांवर कारवाई होईल
ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना होणाऱया त्रासाची तक्रार करताच राज्य सरकारने सोसायटय़ांना चांगलाच दणका दिला आहे. सर्व गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार खात्याने आदेशच जारी केला असून घरकामगार आणि ड्रायव्हर यांना सोसायटीत प्रवेशबंदी करू नये असे स्पष्ट बजावले आहे. एवढेच नव्हे तर स्वतःची नियमावली सोसायटीला तयार करता येणार नाही. घर कामगार, ड्रायव्हर किंवा अन्य काम करणाऱयांना प्रवेश नाकारला तर सोसायटीचे पदाधिकारी यांच्यावर कडक कारवाई होईल अशी तंबीही देण्यात आली आहे.

हुश्श!
‘लॉकडाऊनपूर्वी बरं होतं, फक्त जेवण बनवण्याचेच काम होते. नंतर कामवाली बाई यायची बंद झाली आणि सगळेच काम अंगावर पडले. जीव नकोसा झाला नुसता. आता मात्र सुटका होईल यातून.’
– मंदाकिनी परब, कांदिवली

‘कामवाली बाई ही केवळ कामगार नाही तर तिला आम्ही आमच्या कुटुंबाचाच सदस्य मानतो. लॉकडाऊन काळात आम्ही सर्व महिन्यांचा पूर्ण पगार दिला, इतरही मदत केली. ती येणार याचा आनंदच आहे.’
– गौरी धर्णे, अभ्युदयनगर

‘वर्क फ्रॉम होम करताना केर काढणे, घरची साफसफाई असे मदतकार्य सुरू होते. खोट कशाला सांगू, कधी कधी आमच्यात भांडणेही होत, पण आता कामवाली बाई येईल आणि या मदतकार्यातून माझी सुटका होईल.’
– प्रशांत नार्वेकर, प्रभादेवी

‘रोज रोज काय नवीन रेसिपी बनवायची, कंटाळा आला होता नुसता. शिवाय गुडघेदुखीमुळे झेपतही नव्हते. आता ती पुन्हा कामावर येणार म्हटल्यावर जीवाला जरा बरे वाटले. तिच्या स्वागतासाठी आमचे अवघे घर उत्सुक आहे.’
– भाग्यश्री कांबळे, नेहरू नगर

लाखो लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न – बाळासाहेब पाटील
कोरोनाच्या काळात गृहनिर्माण संस्थांनी आपल्या आकारात घरकामगार तसेच काहनचालक यांना प्रवेशबंदी केली आहे. यासाठी परस्पर नियमावली करण्यात आली. मात्र यामुळे हातावर पोट असणाऱया मोठय़ा वर्गाला उपाशीपोटी राहण्याची वेळ आली. घरकामगारांना अनेकांनी मार्च महिन्याचा पगार दिला. पण एप्रिल आणि मे महिन्यात त्यांना कामच नाही म्हणून पैसेच देण्यात आले नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांना सोसायटीच्या आवारात प्रतिबंध करण्यात आलेला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या