कोरोनाबाबतची माहिती लपवल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांची चीनवर टीका

3277

कोरोनाचा प्रकोप जगभरात सुरू असून आता अमेरिकेला कोरोनाचा फटका बसत आहे. अमेरिकेत 24 तासात 100 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने अमेरिकेत कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेसह जगभरात कोरोनाचा धोका वाढण्याला चीनच जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. चीनने कोरोनाबाबतची माहिती लपवून ठेवल्याबाबत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. चीनने आपल्याला कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत लवकर माहिती द्यायला हवी होती असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरून आता अमेरिका आणि चीनमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

चीनने जागतिक आरोग्य संघटनेला कोरोनाबाबत माहिती दिल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनने राष्ट्रपती शी जिनपिंग यांची प्रशंसा केली होती. मात्र, त्यानंतर जगभरात कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यावर या परिस्थितीला चीन जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेकेडून करण्यात आला. तसेच कोरोना ही नैसर्गिक आपत्ती नसून जैविक युद्धासाठी चीनने तयार केलेले जैविक अस्त्र असल्याचा आरोपही करण्यात आला होता. आपल्या देशात काय सुरु आहे हे चीनने लवकर सांगायला हवे होते. याबाबतच्या घटना सार्वजनिक होईपर्यंत आम्हाला काहीच माहित नव्हते. चीनने माहिती लपवल्याचे दुष्परिणाम आता जग भोगत आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. चीन अत्यंत गुप्तपद्धतीने वागतो आणि जगाला अंधारात ठेवतो हे दुर्दैवी असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र ,आपल्याला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा आदर आहे. ते अंत्यत धैर्याने या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यांनी कमी वेळात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, असेही ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांनी चीनवर टीका करतानाच शी जिनपिंग यांची प्रशंसाही केली आहे.

कोरोना व्हायरसशी लढा देण्याच्या चीनच्या धैर्याचे आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे ट्रम्प यांनी महिन्याभरापूर्वी कौतुक केले होते. मात्र, कोरोना जगभरात झपाट्याने फैलावण्यास सुरुवात झाल्यावर याचा धोका जगसमोर आल्यावर जगभरातून चीनवर टीका होण्यास सुरूवात झाली. आता अमेरिकेत 2 तासात 100 जणांचा मृत्यू झाल्याने ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर टीका केली आहे. चीनने अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळून लावत कोरोना रोखण्यात अमेरिकी प्रशासन अपयशी ठरल्याचा दावा केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या