
इराणसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यात लष्करी तळांच्या वापरावरून वाद निर्माण झाला आहे. इराणवरील संभाव्य लष्करी कारवाईसाठी ब्रिटनने आपल्या हवाई तळांचा (RAF Airbases) वापर करण्यास अमेरिकेला परवानगी नाकारली आहे. या निर्णयामुळे संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टारमर सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या अणुकार्यक्रमावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका लष्करी हल्ल्याची तयारी करत आहे. या मोहिमेसाठी अमेरिकेला दिएगो गार्सिया (Diego Garcia) आणि इंग्लंडमधील आरएएफ फेअरफोर्ड (RAF Fairford) या तळांचा वापर करायचा आहे. मात्र, ब्रिटनच्या स्टारमर सरकारने स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन होऊ नये म्हणून ते या तळांचा वापर कोणत्याही हल्ल्यासाठी करू देणार नाहीत.
ब्रिटनने दिलेल्या नकारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पवित्रा बदलला आहे. ब्रिटनने चागोस बेटांची (Chagos Islands) मालकी मॉरिशसला सोपवण्याच्या निर्णयाला ट्रम्प यांनी मोठी चूक म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी या कराराचे समर्थन केले होते, मात्र आता त्यांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे.
याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, “पंतप्रधान स्टारमर यांनी दिएगो गार्सियावरील ताबा कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये. जर इराणने चर्चा करण्यास नकार दिला, तर या तळाचा वापर करणे अमेरिकेसाठी अत्यंत आवश्यक असेल. ब्रिटनने हे बेट मॉरिशसला भाड्याने देण्याचा निर्णय घेऊन मोठी चूक केली आहे.”
ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, इराण हा केवळ अमेरिकेसाठीच नाही तर ब्रिटनसाठीही मोठा धोका आहे. जर इराणने अणुबॉम्ब तयार केला, तर तो संपूर्ण जगासाठी संकट ठरेल. या वादा मुळे दोन्ही मित्रदेशांमधील राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत.























































