मी कधीच तिथे गेलो नाही; एपस्टीन प्रकरणावरून ट्रम्प यांचा विरोधकांवर राजकीय कटाचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील कुख्यात मानवी तस्कर व सेक्स स्कँडल्सचा सूत्रधार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाइल्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांच्या नावाचा उल्लेख आहे. यावरून राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण सोशल मीडियावर या फाइल्समधील फोटो व्हि़डीओ व्हायरल होत आहेत. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेफ्री एपस्टीनशी असलेल्या संबंधांचे सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, त्यांनी कधीही एपस्टीनच्या खाजगी बेटाला भेट दिली नाही. तसेच त्यांनी अनेक आरोपही केले आहेत की, अनेक ‘भ्रष्ट डेमोक्रॅट्स’ आणि त्यांच्या देणगीदारांनी प्रत्यक्षात त्या बेटाला भेटी दिल्या होत्या, ज्याबद्दल आता चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यांच्यापैकी काहींवर मी खटला दाखल करणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांनी न्याय विभागाने (DOJ) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीचा हवाला देत दावा केला की, जेफ्री एपस्टीन आणि लेखक मायकेल वॉल्फ यांनी मिळून त्यांना राजकीयदृष्ट्या त्रास देण्यासाठी कट रचला होता. ट्रम्प यांनी वॉल्फचा उल्लेख ‘खोटारडा लेखक’ असा केला असून, एपस्टीनसोबत आपली कोणतीही मैत्री नव्हती असे त्यांनी स्पष्ट सांगितले.