कश्मीरचा तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थीस तयार; ‘सीएए’ हा हिंदुस्थानचा अंतर्गत मुद्दा

906

कश्मीर प्रश्न ही मोठी समस्या आहे. याप्रश्नी मला काही मदत करता आली तर करण्यास तयार आहे. तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थीस तयार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीनंतर ट्रम्प यांची पत्रकार परिषद झाली. 53 मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत कश्मीरचा मुद्दा उपस्थित झाला. कश्मीर प्रश्नावर अमेरिका थेट मध्यस्थी करणार का? या प्रश्नावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्टपणे उत्तर दिले नाही. मात्र, पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या दोघांशीही आपले चांगले संबंध आहेत. कश्मीर हा कळीचा मुद्दा आहे. प्रत्येक बाबीला दोन बाजू असतात. कश्मीरप्रश्नी तणाव कमी करण्यास, मध्यस्थी करण्यास, मदत करण्यास मी तयार आहे असे ट्रम्प म्हणाले.

सीएए कायद्याबाबत निर्णय इथल्या सरकारचा आहे. मला त्यात बोलण्याचा अधिकार नाही. सीएए हा हिंदुस्थानचा अंतर्गत मुद्दा आहे असे सांगून ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुस्थानातील मुस्लिम नागरिकांसोबत प्रदीर्घ काळ सौहार्दाने काम करीत आहेत. याआधी देशात 4 कोटी संख्या असलेल्या मुस्लिमांची लोकसंख्या 20 कोटी झालीय असे मोदी यांनीच मला सांगितलेय. त्यामुळे मला यावर चर्चा करायची नाही

हिंदुस्थान आमच्या मालावर तुफानी कर लावतो

हिंदुस्थान आणि अमेरिकेतला व्यापार करार लांबण्याचे कारण म्हणजे हिंदुस्थान आमच्या निर्यात मालावर तुफानी कर लावतोय. त्यामुळे अमेरिकन व्यापाऱ्यांना हिंदुस्थानशी व्यापार करताना जास्त मोबदला मोजावा लागतोय. हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल कंपनीला याचा मोठा फटका नुकताच बसलाय, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

सीमेपलीकडचा दहशतवाद थांबायलाच हवा

हिंदुस्थानी सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी पाकिस्ताननेही प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. हा हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातला कळीचा मुद्दा आहे. दोन्ही देशांचे पंतप्रधान माझे चांगले मित्र आहेत. दहशतवाद संपविण्यासाठी या देशांना जी मदत लागेल ती पुरवायला अमेरिका नेहमीच तयार असेल असेही आश्वासन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानात होणाऱया दहशतवादी हल्ल्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या