
हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार व्हावा म्हणून नरेंद्र मोदी मला खूश करू पाहत आहेत. त्यासाठी गेल्या काही महिन्यांत हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. ‘हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी पूर्ण थांबवली नाही तर आणखी टॅरिफ लावण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली.
‘एअर पर्ह्स वन’ विमानात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘नरेंद्र मोदी हे चांगले गृहस्थ आहेत. त्यांना माहीत आहे की मी खूश नाही आणि मी खूश असणे महत्त्वाचे आहे. ते आमच्याशी व्यापार करतात आणि मी कोणत्याही क्षणी टॅरिफ वाढवू शकतो, असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यास दुजोरा दिला. ‘हिंदुस्थान टप्प्याटप्प्याने रशियाकडून तेल खरेदी कमी करत आहे असे हिंदुस्थानचे अमेरिकेतील राजदूत विनय क्वात्रा यांनी आम्हाला कळवले असून टॅरिफमधून दिलासा देण्याची विनंतीही केली आहे,’ असे ग्रॅहम म्हणाले.
काँग्रेसची टीकेची झोड
ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारला घेरले आहे. ‘हाउडी मोदी, नमस्ते ट्रम्प’ आणि स्व-स्तुतीसाठी केलेल्या इव्हेंटमधून हिंदुस्थानला पुठलाही दृश्य फायदा झाल्याचे दिसत नाही हेच ट्रम्प यांच्या वक्तव्यातून दिसते, असे रमेश म्हणाले.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांच्या घरावर हल्ला
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांच्या घरावर हल्ला झाला आहे. एका अज्ञात इसमाने रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घराच्या खिडक्यांवर हातोडय़ाने प्रहार केले. तसेच इतर वस्तूंचीही नासधूस केली. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.





























































