
अमेरिकेत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱया जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित आणखी 30 हजार फाईल्स अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केल्या. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शेकडो वेळा उल्लेख असून ट्रम्प यांनी एपस्टीनचे प्रायव्हेट जेट ‘लोलिता’मधून आठवेळा प्रवास केल्याचेही समोर आले आहे.
आज जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांचे नाव बातमी किंवा एखाद्या नोंदीसंदर्भात आले आहे. मात्र, काही कागदपत्रे थेट ट्रम्प यांच्याशी संबंधित आहेत. त्यात जानेवारी 2020मधील एक ईमेल आहे. ट्रम्प यांनी 1993 ते 1996 या कालावधीत एपस्टीन याच्या खासगी विमानातून 8 वेळा प्रवास केला होता, अशी नोंद या ईमेलमध्ये आहे. या नोंदींनुसार, एका प्रवासादरम्यान ट्रम्प, एपस्टीन आणि एका 20 वर्षांच्या व्यक्तीची नोंद असून तिची ओळख लपविण्यात आली आहे. ट्रम्प यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप करण्यात आलेला नाही. मात्र, या फाईल्समध्ये खोटे आणि खळबळजनक दावे असू शकतात, असेही न्याय विभागाने स्पष्ट केले आहे.
एपस्टीन फाईल्समुळे निरपराधांची प्रतिमा बिघडण्याचा धोका – ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीन फाईल्ससंदर्भात मत मांडले आहे. ते म्हणाले की, या फाईल्स जगजाहीर झाल्यामुळे अनेक निरपराधांची प्रतिमा मलीन होऊ शकते. एपस्टीन याला अनेक जण एकेकाळी भेटायचे. त्याच्या गुह्यांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. एकत्र फोटो काढणे हा गुह्यात सहभागाचा पुरावा नाही. रिपब्लिकन पक्षाच्या यशापासून लक्ष विचलित करण्यासाठी एपस्टीनवरुन गोंधळ घातला जात आहे. बिल क्लिंटन यांची छायाचित्रे उघड झाल्यामुळे मला चांगले वाटले नाही, असेही ट्रम्प म्हणाले.
एपस्टीनच्या मृत्यूचा फेक व्हिडीओ अपलोड
जेफ्री एपस्टीन याच्या मृत्यूशी संबंधित एक व्हिडीओ न्याय विभागाने रात्री उशीरा अपलोड केला. मात्र, तो काही मिनिटांमध्येच हटविण्यात आला. 12 सेकंदांच्या या व्हिडीओत एक जण आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र, व्हिडीओ खोटा असून तो एआयच्या मदतीने बनविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ हटविण्यात आला.
































































